मद्यधुंद तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण; पोलिसांची बघ्याची भूमिका? व्हिडिओ आणि फोटोंमुळे कारवाईवर प्रश्नचिन्ह
खेड (प्रतिनिधी) : खेड बसस्थानकात एसटी वाहकाला मारहाण केल्याच्या घटनेने आता वेगळेच वळण घेतले आहे. खेडहून तिसंगी येथे जाणाऱ्या एसटी बसमध्ये एका मद्यधुंद तरुणाने कर्तव्यावर असलेल्या वाहकाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर बसस्थानकातील कर्मचारी संतप्त झाले. मात्र, या तरुणाला ताब्यात घेण्यासाठी पोलीस घटनास्थळी आले असतानाच एसटी कर्मचाऱ्यांनी पोलिसांसमोरच संबंधित तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे व्हिडिओ आणि छायाचित्रांमधून समोर आल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे वाहकाला मारहाण करणाऱ्या तरुणासोबतच कायदा हातात घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खेड बसस्थानकात तिसंगीच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसमध्ये एका मद्यधुंद तरुणाने वाहकाशी वाद घालत त्याला मारहाण केली. कर्तव्य बजावत असलेल्या सहकाऱ्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच बसस्थानकातील अन्य एसटी कर्मचारी संतप्त झाले. यानंतर संबंधित तरुणाला कर्मचाऱ्यांनी घेरले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असतानाही तरुणाला मारहाण सुरू असल्याचे दृश्य व्हिडिओ आणि छायाचित्रांमधून समोर आल्याचे पहावयास मिळत आहे.
या घटनेत एसटी कर्मचाऱ्यांनी संबंधित तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे दृश्य समोर आल्याने बसस्थानक परिसरात चर्चेला उधाण आले आहे. वाहकाला मारहाण झाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संताप निर्माण होणे मान्य आहे मात्र, संतापाच्या भरात कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही आहे का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. पोलिसांसमोरच मारहाण होत असताना पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली का, याबाबतही चर्चा सुरू आहे. तथापि, पोलिसांनी नेमकी कोणती भूमिका घेतली आणि संबंधित परिस्थितीत हस्तक्षेप केला होता का, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, या प्रकरणात संबंधित तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. मात्र, वाहकाला मारहाण करणाऱ्या तरुणाविरोधात तसेच पोलिसांसमोर मारहाण करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांविरोधात कोणती कायदेशीर कारवाई करण्यात आली, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली आहे की नाही, याची माहितीही उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे खेड पोलिसांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावताना कायद्याचे संरक्षण मिळत असले, तरी त्या संरक्षणाचा अर्थ कायदा हातात घेण्याची मुभा असा होत नाही. प्रवाशांची सेवा करताना कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले निंदनीय आहेत; त्याचप्रमाणे कोणत्याही व्यक्तीला मारहाण करून स्वतःच शिक्षा देण्याचा अधिकारही कोणाला नाही. या घटनेत दोन्ही बाजूंच्या कथित कृत्यांची निष्पक्ष चौकशी होऊन वस्तुस्थिती समोर येणे आवश्यक आहे.
खेड बसस्थानक परिसरात या घटनेनंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या वर्तनाबाबत तसेच त्यांना मिळणाऱ्या कायदेशीर संरक्षणाबाबत प्रवाशांमध्ये चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. काही प्रवाशांकडून कर्मचाऱ्यांच्या अरेरावी आणि उद्दामपणाबाबत नाराजी व्यक्त होत असल्याचीही चर्चा आहे. मात्र, या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
कर्तव्यावर असलेल्या वाहकाला मारहाण करणाऱ्या तरुणावर काय कारवाई होणार आणि पोलिसांसमोरच तरुणाला मारहाण करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर कोणती होणार होणार का, हे आता महत्त्वाचे ठरणार आहे. ‘कायदा सर्वांसाठी समान आहे का?’ हा प्रश्न या घटनेच्या निमित्ताने खेड बसस्थानकात उपस्थित होत असून, पोलिसांकडून अधिकृत माहिती आणि कारवाईचा तपशील समोर येण्याची प्रतीक्षा आहे.













