मातोंड येथील राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत देवगड ची ‘डंपिंग टू गेदर’ प्रथम…

नवरात्रोत्सवानिमित्त आयोजन : ठाणे ची ‘लागली’ द्वितीय, तर देवगडची ‘लगोरी’ तृतीय..

वेंगुर्ले : दाजी नाईक

तालुक्यातील मातोंड येथील श्री देवी सातेरी मंदिरात आयोजित ‘जागर आदिशक्तीचा नवरात्रोत्सव २०२६’ अंतर्गत झालेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत नाट्यसंस्कार देवगड यांच्या ‘डंपिंग टू गेदर’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला. NKT ठाणावाला स्वायत्त ग्रुप, ठाणे यांच्या ‘लागली’ या एकांकिकेला द्वितीय, तर युथ फोरम देवगड यांच्या ‘लगोरी’ या एकांकिकेला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. कोल्हापूरच्या ‘साडे तीन हाताचा हिशोब’ आणि लांजा येथील कलारंग थिएटर्सच्या ‘नाडा’ या एकांकिकांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.

राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेमुळे मातोंडच्या नवरात्रोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमाला विशेष रंगत आली. विविध नाट्यसंघांनी आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर उपस्थित रसिकांची मने जिंकली. स्पर्धेचे परीक्षण अभय खडपकर आणि संजय पुनाळेकर यांनी केले.

या कार्यक्रमाला सरपंच मयुरी वडाचेपाटकर, त्रिंबक आजगावकर गुरुजी, माजी उपसरपंच नितीन परब, देवस्थानचे गावकर रविकिरण परब, विजय परब, पोलीस पाटील सागर परब, पत्रकार दीपेश परब, महेंद्र मातोंडकर, गिरीष मेडिकलचे प्रसाद गुरव उपस्थित होते.

तसेच श्री देवी सातेरी युवक कला क्रीडा मंडळाचे पदाधिकारी महेश पाटकर, गायेश परब, देवेश परब, देवेंद्र परब, बाजा परब, दर्शन परब यांच्यासह मंडळाचे अन्य पदाधिकारी व नाट्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मातोंड येथे धार्मिक कार्यक्रमांसोबतच अशा सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करून ग्रामीण भागातील नाट्यकलेला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद हा या उपक्रमाच्या यशाची साक्ष ठरला.