माध्यमिक विद्यालय नाटळ येथे ‘नवदुर्गा सन्मान सोहळा २०२६’ उत्साहात संपन्न

विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नऊ कर्तृत्ववान महिलांचा गौरव; विद्यार्थ्यांना मिळाली प्रेरणेची शिदोरी

नाटळ, ता. कणकवली : राजवाडी उत्कर्ष मंडळ (नाटळ) मुंबई संचलित माध्यमिक विद्यालय नाटळ येथे कै. वासंती वसंत सावंत (मोठी आई) यांच्या स्मरणार्थ, सौ. उमा भालचंद्र सावंत यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आलेला ‘नवदुर्गा सन्मान सोहळा २०२६ ‘ हा सोहळा उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. सलग तीन वर्षे या पुरस्काराचे आयोजन केले जात असून यंदाचे पुरस्काराचे चौथे वर्ष आहे. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रणिता तेली-बांबुळकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात सर्व सत्कारमूर्तींच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. प्रशालेतील विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर करून मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. प्रणिता तेली-बांबुळकर यांनी केले. ‘नवदुर्गा’ हे नाव सामर्थ्य, धैर्य, भक्ती, ज्ञान आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक असल्याचे सांगत, समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यामागील उद्देश त्यांनी स्पष्ट केला.

या सोहळ्यात विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या नऊ महिलांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये सौ. संध्या तेरसे संस्थापिका नर्मदाआई औद्योगिक सहकारी संस्था (कुडाळ), सौ. जागृती पोटले ग्रामीण उद्योजिका (खारेपाटण), डॉ. स्मिता सुरवसे ( प्राचार्य संत राऊळ महाराज विद्यालय, कुडाळ), सौ. शर्मिला केळुसकर सहाय्यक शिक्षिका माध्यमिक विद्यामंदिर प्रशाला (कणकवली), श्रीमती संध्या तांबे, ज्येष्ठ कवयित्री (मालवण), कु. श्रुती रेवाळे आदर्श विद्यार्थिनी (दिगवळे), कु. भाग्यश्री सुतार महिला भजनी कलाकार (नाटळ), सौ. अक्षता कांबळी महिला दशावतार कलाकार (कणकवली) आणि श्रीमती वंदना राणे प्राथमिक मुख्याध्यापिका, बालभारती मंडळ सदस्य (कणकवली) यांचा समावेश होता. सर्व सत्कारमूर्ती या विविध विशेष पुरस्कारानी सन्मानित आहेत.

या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे सर्व नवदुर्गा सत्कारमूर्तींचा सन्मान शाळा व्यवस्थापन समितीच्या महिला सदस्यांच्या हस्ते करण्यात आला. महिलांच्या हस्ते महिलांचा सन्मान या संकल्पनेतून महिला सक्षमीकरण, परस्पर आदर आणि स्त्रीकर्तृत्वाचा गौरव यांचा सुंदर संदेश देण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना सर्व सत्कारमूर्तींनी आपापले मनोगत व्यक्त केले. त्यांच्या जीवनप्रवासातील अनुभव, संघर्ष, कार्याप्रती असलेली निष्ठा आणि यश मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न यांतून विद्यार्थ्यांना तसेच उपस्थित महिलांना प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले. प्रत्येक मनोगतातून जिद्द, आत्मविश्वास, सातत्य आणि समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचे महत्त्व अधोरेखित झाले. सत्कारमूर्तींचे अनुभवकथन हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले.

“शाळा ही केवळ पुस्तकी ज्ञान देणारी संस्था नसून विद्यार्थ्यांमध्ये जीवनमूल्यांची रुजवण करणारे संस्कारकेंद्र आहे,” हा विचार या सोहळ्यातून प्रभावीपणे अधोरेखित झाला. यशस्वी होण्यासाठी परिस्थितीपेक्षा इच्छाशक्ती महत्त्वाची असते, तर समाजात परिवर्तन घडविण्यासाठी मोठ्या पदापेक्षा व्यापक विचार आणि सेवाभाव अधिक मोलाचे असतात, हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला. विविध क्षेत्रांत कार्यरत महिलांचे कर्तृत्व आणि त्यांचा जीवनप्रवास विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारा आहे.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या दीपा घाडीगावकर, शमिका सावंत, उर्मिला सुतार, श्वेता वर्दम, सेजल नाटळकर, सानिका गावकर, अंकिता गावकर, प्रीती पेंडूरकर आणि सुरेखा नाटळकर यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन यामध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सौ. उज्ज्वला पवार यांनी केले, तर तेजस्विनी सावंत यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष श्री. नितीन सावंत, शालेय समिती सदस्य श्री. राजू सावंत, प्रशालेचे शिक्षक श्री. दिनेश गावित, श्री. सुनील मेस्त्री, श्री. सुरेश कोकणी तसेच सर्व शिक्षकेतर सहकारी, ग्रामस्थ आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महिलांच्या कार्याचा गौरव करण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये स्त्री-सन्मान, समानता, आत्मविश्वास आणि सामाजिक जाणीव रुजविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या उपक्रमातून साध्य झाले. महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करून त्यांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला करून देणारा हा ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उपस्थितांसाठी प्रेरणेचा आणि सकारात्मक विचारांचा अविस्मरणीय अनुभव ठरला.