पुस्तकांचे वाचन हीच खरी समृद्धी : सचिन धोपेश्वरकर 

मळगाव वाचन मंदिरात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

वाचाल तर वाचाल’ हे सूत्रच आपल्याला समृद्ध बनवते 

सावंतवाडी । प्रतिनिधी :आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियावरून मिळणारी आयती माहिती माणसाची विचार करण्याची क्षमता व गती कमी करते. पुस्तकांचे वाचन हीच खरी समृद्धी असून संदर्भासाठी प्रिंट मीडिया हाच शाश्वत मार्ग आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी जास्तीत जास्त पुस्तके वाचून आपली वैचारिक प्रगल्भता वाढवावी, कारण ‘वाचाल तर वाचाल’ हे सूत्रच आपल्याला समृद्ध बनवते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचन मंदिराचे अध्यक्ष महेश खानोलकर उपस्थित होते.

मळगांव येथील प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरात वाचन संस्कृती दृढ व्हावी या हेतूने वाचन प्रेरणा दिन विविध उपक्रमांनी अतिशय उत्साह साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध नाट्यकर्मी व दिग्दर्शक सचिन धोपेश्वरकर उपस्थित होते.तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचन मंदिराचे अध्यक्ष महेश खानोलकर होते.

या प्रसंगी वाचन संस्कृती दृढ करण्याच्या उद्देशाने वाचन मंदिराच्या उत्कृष्ट वाचकांचा विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये आजीव सभासद वाचक माजी मुख्याध्यापिका श्रद्धा सावंत आणि आजीव सभासद वाचक मानसी गवंडे यांचा उत्कृष्ट वाचक म्हणून शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प, प्रमाणपत्र व ग्रंथभेट देऊन गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे सर्वसाधारण वाचक सभासद ज्ञानेश्वर राणे, अनिशा जाधव तसेच बालवाचक कुमार आदित्य बांदिवडेकर व कु. खुशी लातये यांना गुलाबपुष्प व ग्रंथभेट देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमात मळगाव हायस्कूलच्या इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने व सक्रिय सहभाग नोंदविला.

यामध्ये कुमार शशांक गावकर यांनी आयझॅक न्यूटन, कु. स्वरा परब यांनी सी. व्ही. रमण, कु. सिद्धी शिरोडकर यांनी ए. पी. जे. अब्दुल कलाम, कु. शिवाजी नाईक यांनी विक्रम साराभाई यांच्या विचारांचे सादरीकरण केले, तर कु. ईश्वरी साठेलकर हिने न्यूटन कथा सादर करून थोर शास्त्रज्ञांच्या विचारांवर आपले मनोगत व्यक्त केले.

या सोहळ्याला वाचन मंदिराचे उपाध्यक्ष बाबली उर्फ आबा नार्वेकर, संचालक शांताराम गवंडे, चंद्रकांत जाधव, माजी मुख्याध्यापक वैजनाथ देवन, बाळकृष्ण मुळीक, आनंदी मोर्ये यांच्यासह वाचन मंदिराचे सर्व सभासद, हितचिंतक व देणगीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार संस्थेच्या कार्यवाह सौ. स्नेहा महेश खानोलकर यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल आनंद देऊळी, लिपिक सौ. देवयानी मळगावकर आणि कर्मचारी सुभाष तोरस्कर यांनी विशेष परिश्रम घेतले.