कणकवली : घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केल्याच्या कारणावरून झालेल्या वादात महिलेला धक्काबुक्की, तर तिच्या पतीला स्टीलच्या जेवणाच्या ताटाने मारहाण केल्याची घटना सोमवारी (ता. १९) दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास भालचंद्र नगर येथे घडली. या घटनेत गजानन प्रभाकर साटविलकर (वय ५०) यांच्या डाव्या डोळ्याच्या भुवईवर दुखापत झाली. तर त्यांच्या पत्नी ग्रिष्मा साटविलकर (वय ४७) यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी ग्रिष्मा साटविलकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी माधव सुभाना पाकले याच्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, साटविलकर कुटुंबीयांचे भालचंद्र नगर परिसरात भालचंद्र बाबांच्या मठाजवळ घर आहे. या घराचे दोन भाग असून, त्यापैकी एका भागात माधव सुभाना पाकले आणि त्यांची बहीण राहतात. तर दुसरा भाग साटविलकर कुटुंबीयांच्या मालकीचा असून, तो बंद ठेवण्यात येतो. या घराच्या मालकीवरून यापूर्वीही वाद झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
सोमवारी दुपारी ग्रिष्मा साटविलकर यांना स्थानिकांनी त्यांच्या भालचंद्र नगर येथील घराचे कुलूप तोडून माधव पाकले आत काहीतरी करत असल्याची माहिती दिली. त्यानंतर त्या पती गजानन साटविलकर यांच्यासह घटनास्थळी पोहोचल्या. त्यावेळी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडलेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
याबाबत विचारणा करण्यासाठी ग्रिष्मा साटविलकर या पाकले यांच्या बहिणीला हाक मारत असताना माधव पाकले खोलीतून बाहेर आले. त्यांनी ग्रिष्मा यांचा डावा हात पकडून त्यांच्याशी धक्काबुक्की केली. तसेच गजानन साटविलकर यांच्या डाव्या डोळ्याच्या भुवईवर स्टीलचे जेवणाचे ताट मारल्याने ते जखमी झाले, असे तक्रारीत म्हटले आहे.
घटनेनंतर ग्रिष्मा साटविलकर यांनी डायल ११२ वर संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी गजानन साटविलकर यांना उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून, ग्रिष्मा साटविलकर यांच्यावरही उपचार करण्यात आले.
याप्रकरणी ग्रिष्मा साटविलकर यांनी माधव सुभाना पाकले यांच्याविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी माधव पाकले याच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.












