भांडण्यासाठी सभागृहाचा वापर नको!’ दीपलक्ष्मी पडते!
भांडणाचे फोटो व्हायरल करून जि प ची बदनामी करू नका! अध्यक्ष प्रमोद कामत
सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी
सोळाव्या वित्त आयोगाच्या आराखड्याला सोमवारी झालेल्या सिंधुदुर्ग जि.प. खास सभेत बहुमताने मंजुरी देण्यात आली! सत्ताधारी सदस्यांनी ठरावाच्या मंजुरीसाठी “मंजूर”असा बहुमताचा आवाज चढविला! तर पाच विरोधी सदस्यांनी निषेधाच्या घोषणा देत सभात्याग केला! या गदारोळात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष दीपलक्ष्मी पडते यांनी सभागृहाचा वापर जिल्ह्याच्या विकासावर अभ्यासपूर्ण चर्चा करण्यासाठी करावा, भांडणासाठी नव्हे! अशा शब्दांत सदस्यांना सुनावले. त्याच मुद्द्याला पुढे नेत जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी आपलेच काही सदस्य सभागृहातील वादाचे फोटो काढून व्हायरल करीत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या अध्यक्षतेखाली ही खास सभा झाली. व्यासपीठावर उपाध्यक्ष दादा साईल, सभापती संतोष साटविलकर, प्रितेश राऊत, अनुराधा नारकर, रुहिता तांबे तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड यांच्यासह जिल्हा परिषदेचे सदस्य खाते प्रमुख अधिकारी उपस्थित होते. सभागृहाचे सदस्य सचिव म्हणून सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यानी काम पाहिले.
केंद्र सरकारच्या सोळाव्या वित्त आयोगाच्या निधीतून सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात जिल्हा परिषद स्तरावर राबविण्यात येणाऱ्या विकासकामांच्या आराखड्याला मंजुरी देणे हा सभेतील मुख्य विषय होता. गावागावांतील विकासकामांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या आराखड्यावर सभागृहात निर्णय झाला. मात्र, या निर्णय आणि ठराव प्रक्रिये दरम्यान सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले. विकासाच्या या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा होण्याऐवजी सभागृहात वादंग आणि निषेधाचे वातावरण निर्माण झाले.बहुमताच्या जोरावर आराखड्याला मंजुरी मिळाली असली, तरी पाच विरोधी सदस्यांनी निषेध नोंदवत सभात्याग केल्याने राजकीय संघर्षही ठळकपणे समोर आला.
सभागृहातील वादंगाच्या पार्श्वभूमीवर दीपलक्ष्मी पडते यांनी सदस्यांचे लक्ष विकासाच्या मूळ मुद्द्याकडे वेधले. जिल्ह्यातील विकासकामांवर सखोल आणि अभ्यासपूर्ण चर्चा व्हावी, नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळावा, यासाठी सभागृहाचा उपयोग झाला पाहिजे. मात्र, चर्चा बाजूला पडून भांडणांना महत्त्व मिळत असेल, तर त्याचा उपयोग काय, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली! दरम्यान, सभागृहातील वादाचे फोटो काढून ते समाजमाध्यमांवर व्हायरल केले जात असल्याबद्दल अध्यक्ष प्रमोद कामत यांनीही नाराजी व्यक्त केली. विकासाच्या कामांसाठी असलेल्या सभागृहातील मतभेद सार्वजनिकरीत्या चव्हाट्यावर आणण्यापेक्षा जिल्ह्याच्या हितासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचा सूर त्यांच्या वक्तव्यातून उमटला.
सोळाव्या वित्त आयोगाच्या आराखड्याला मंजुरी मिळाल्याने गावोगावच्या विकासकामांसाठी पुढील प्रक्रिया सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, या सभेतील वादंग, विरोधकांचा सभात्याग आणि सदस्यांनी व्यक्त केलेली नाराजी यामुळे जिल्हा परिषदेतील सत्ताधारी-विरोधकांमधील राजकीय संघर्षही चर्चेचा विषय ठरला.
सभेच्या प्रारंभी दिवंगत अभिनेते नाना पाटेकर, व जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिवंगत एस. टी. सावंत यांच्या निधनाबद्दल जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी तर वर्दे गावातील दामिनी पालव हिच्या मृत्यूबाबत दीपलक्ष्मी पडते यांनी मांडलेल्या शोक प्रस्तावावर सभागृहाने श्रद्धांजली वाहिली.













