गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम
शिवप्रेमीच्या सहभागातून शिवकालीन परंपरेचे जतन
आचरा
दसऱ्याच्या मंगलमय पर्वाचे औचित्य साधून ‘आधी तोरण गडाला, मग घराला’ हा अनोखा उपक्रम किल्ले भगवंतगड येथे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात आला. या उपक्रमातून गड-किल्ल्यांविषयी आदर, ऐतिहासिक वारशाचे जतन आणि शिवकालीन परंपरेची जपणूक करण्याचा संदेश देण्यात आला.
दसऱ्याच्या दिवशी घराला तोरण बांधण्यापूर्वी गडाला तोरण बांधण्याची संकल्पना या उपक्रमातून प्रत्यक्षात आणण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या गड-किल्ल्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. ऐतिहासिक वास्तू आणि गड-किल्ल्यांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या उपक्रमात आकाश मेस्त्री, स्वप्नील शिर्सेकर, हर्षद मडवळ, प्रथमेश चव्हाण, प्रकाश अपराज, राजन पालकर, सोहम घाडीगावकर, वरद जोशी आदी शिवप्रेमी सहभागी झाले होते.
‘आधी तोरण गडाला, मग घराला’ या उपक्रमातून दसऱ्याच्या परंपरेला ऐतिहासिक वारसा संवर्धनाची जोड देत गड-किल्ल्यांविषयी अभिमान आणि जिव्हाळा जपण्याचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला.













