वन्यजीव छायाचित्रणात आंतरराष्ट्रीय भरारी : इन्व्हर्टिब्रेट्स’ श्रेणीत ‘कॅटेगरी विनर’ चा सर्वोच्च मान

सावंतवाडी । प्रतिनिधी : लंडनच्या प्रतिष्ठित नॅचरल HISTORICAL म्युझियमतर्फे आयोजित ‘वाईल्डलाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर’ (WPY) या जागतिक दर्जाच्या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छायाचित्रकार सिताराम दिनकर राऊळ यांनी बाजी मारली आहे. वन्यजीव छायाचित्र क्षेत्रातील ‘ऑस्कर’ मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेत त्यांनी ‘इन्व्हर्टिब्रेट्स’ (अपृष्ठवंशीय जीव) श्रेणीत ‘कॅटेगरी विनर’ असा सर्वोच्च मान पटकावला आहे. जगभरातून आलेल्या ६५ हजारांहून अधिक छायाचित्रांच्या स्पर्धेतून त्यांच्या कलाकृतीची या विजेतेपदासाठी निवड करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील घोटगेवाडी येथील मूळ रहिवासी असलेले आणि सध्या बदलापूर येथे वास्तव्यास असलेले सिताराम राऊळ हे संभाव्य विजेते म्हणून चार दिवसांपूर्वी लंडनला रवाना झाले होते. तेथे आयोजित दिमाखदार सोहळ्यात त्यांना अधिकृतपणे अंतिम विजेता म्हणून गौरविण्यात आले. त्यांच्या या अभूतपूर्व यशामुळे कोकण, मुंबई महानगर परिसर आणि संपूर्ण महाराष्ट्राची मान जागतिक स्तरावर उंचावली आहे.
पुरस्कारप्राप्त छायाचित्रात वाळवंटातील एक विंचू वाळूत खड्डा खोदून स्वतःसाठी निवारा तयार करत असतानाचा अत्यंत दुर्मीळ क्षण टिपण्यात आला आहे. प्रतिकूल वातावरणाशी जुळवून घेत अस्तित्व टिकवण्यासाठी चाललेली त्याची धडपड या दृश्यातून अतिशय प्रभावीपणे व्यक्त होते. सहसा मोठ्या आणि आकर्षक वन्यप्राण्यांकडे कल असणाऱ्या या क्षेत्रात वाळूतील लहानशा जीवाच्या जीवनातील हा महत्त्वपूर्ण टप्पा जगासमोर आणणे, हे या चित्राचे मुख्य वैशिष्ट्य ठरले आहे.
सिताराम राऊळ गेल्या १४ वर्षांपासून छायाचित्रण क्षेत्रात सातत्याने कार्यरत असून वन्यजीव, मॅक्रो आणि क्रिएटिव्ह नेचर फोटोग्राफीमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. व्यावसायिक छायाचित्रकार असलेल्या राऊळ यांना चित्रकलेचीही उत्तम जाण आहे. त्यांचे चित्रकलेचे गुरू सुरेश भोसले यांच्या फाईन आर्टच्या मार्गदर्शनामुळे त्यांना लाभलेली कलात्मक दृष्टी, रंगांची जाण आणि प्रकाशाचा कल्पक वापर त्यांच्या प्रत्येक छायाचित्रणात स्पष्टपणे दिसतो. यापूर्वीही त्यांच्या कामाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
आपल्या या यशाबद्दल बोलताना राऊळ यांनी कुटुंबीय, छायाचित्रकार मित्र, मार्गदर्शक तसेच कोकण व बदलापूरच्या निसर्गाचे आभार मानले आहेत. निसर्गातील दुर्लक्षित घटक, विशेषतः विंचू आणि कीटकांसारख्या लहान अपृष्ठवंशीय जीवांचे पर्यावरणीय समतोलातील स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. या जागतिक सन्मानामुळे अशा लहानात लहान जीवांच्या संरक्षणाकडे आणि अधिवासाकडे जगाचे लक्ष वेधले जाईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. निसर्गाविषयी कुतूहल आणि संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी छायाचित्रणाच्या माध्यमातून जैवविविधतेचे हेच दुर्लक्षित पैलू पुढेही लोकांसमोर आणत राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.













