मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांच्या सत्रानंतर वाटूळ येथील प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न ऐरणीवर आश्वासनांची पूर्तता कधी होणार? राजापूर वासियांचा संतप्त सवाल

संतोष मोंडे, राजापूर: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच असून, बुधवारी राजापूर तालुक्यातील वाटूळ येथील धोकादायक उतारावर झालेल्या भीषण अपघातामुळे या भागातील आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे पुन्हा एकदा वेशीवर टांगले गेले आहेत. इनोव्हा कारने रिक्षाला दिलेल्या धडकेत दोन निष्पाप बालकांसह ५ जण गंभीर जखमी झाले. मात्र, नेहमीप्रमाणेच या जखमींना प्राथमिक उपचारानंतर तब्बल ६० ते ७० किलोमीटर दूर असलेल्या रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलवावे लागले. या घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवली ते रत्नागिरी या १०० किलोमीटरच्या पट्ट्यात हक्काचे ‘मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’ असावे, ही अनेक वर्षांची मागणी आता पुन्हा एकदा तीव्रतेने ऐरणीवर आली आहे.
महामार्गावरील राजापूर आणि लांजा हा परिसर अपघातांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानला जातो. अपघातानंतरचा पहिला तास (गोल्डन अवर) हा रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. परंतु, राजापूर ते रत्नागिरी या प्रवासादरम्यान अत्याधुनिक उपचारांची कोणतीही सोय उपलब्ध नसल्याने, अनेकदा गंभीर जखमी रुग्ण वाटेतच दम तोडतात. उपचाराअभावी होणारे हे हकनाक मृत्यू रोखण्यासाठी महामार्गावर मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ‘वाटूळ-ओणी’ परिसरात सर्व सोयींयुक्त सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याची मागणी गेली अनेक वर्षे स्थानिक जनतेकडून केली जात आहे.
वाटूळ हे ठिकाण राजापूर आणि लांजा या दोन्ही तालुक्यांच्या मध्यभागात येत असल्याने, येथे हॉस्पिटल झाल्यास रुग्णांना अवघ्या १५ ते २० मिनिटांत तज्ज्ञ डॉक्टरांचे उपचार मिळणे शक्य होईल. याच भौगोलिक महत्त्वाचा विचार करून ‘पंचक्रोशी ग्रामविकास समिती’ गेली अनेक वर्षे या हॉस्पिटलसाठी शासन आणि प्रशासकीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा करत आहे. मात्र, केवळ निधीअभावी आणि लालफितीच्या कारभारामुळे हा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रकल्प कागदावरच रखडला असल्याची भावना स्थानिक जनतेतून व्यक्त होत आहे.
काही महिन्यांपूर्वी राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी या संदर्भातील शिष्टमंडळाला सकारात्मक प्रतिसाद देत, संबंधित उच्च अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अनेक वर्षे उलटूनही अद्याप या बैठका आणि आश्वासनांच्या पलीकडे कोणतीही ठोस हालचाल झालेली दिसत नाही. लोकप्रतिनिधींची हीच अनास्था आता येथील जनतेच्या जिवावर बेतत आहे.
` एकीकडे मुंबई-गोवा महामार्गाचे काम ९० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाल्याचा दावा केला जात असताना, दुसरीकडे याच महामार्गावर अपघातग्रस्तांचे जीव वाचवण्यासाठी एक सुसज्ज रुग्णालय सरकारला उभारता येत नाही, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. आता तरी सरकारने जागृत होऊन वाटूळ येथील प्रस्तावित सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी विशेष निधी मंजूर करावा आणि हा प्रश्न युद्धपातळीवर मार्गी लावावा, अशी मागणी राजापूर-लांजा येथील जनता आणि पंचक्रोशी ग्रामविकास समितीकडून अत्यंत आक्रमकपणे केली जात आहे.
वाटूळ येथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व्हावे, ही मागणी केवळ एक सुविधा म्हणून नाही, तर महामार्गावरील हजारो प्रवाशांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत आवश्यक आहे. अनेक वर्षांपासून केवळ निधी अभावी हा प्रकल्प रखडणे म्हणजे लोकांच्या आरोग्याशी आणि जिवाशी खेळण्यासारखे आहे. एखादा गंभीर अपघात किंवा हृदयविकाराचा आल्यास स्थानिक गरिबांना महागड्या खाजगी रुग्णवाहिका करून दूरवर जावे लागते. आमदार किरण सामंत यांनी यासाठी पुढाकार घेवून या हॉस्पीटलसाठी निधी उपलब्ध करावा अशी मागणी होत आहे.

महाराष्ट्र शासनाने ११ जुलै २०२४ रोजीच्या शासन निर्णयाने वाटूळ ता. राजापूर येथे विशेष बाब म्हणून १०० खाटांचे सुपर मल्टीस्पेशालिटी रूग्णालयास मान्यता दिलेली आहे. तर महसुल विभागाने वाटूळ येथील गट क्र. ८६६ क्षेत्र ९.७१.०० हे. आर. या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेपैकी ५ एकर जागा सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलकरिता हस्तांतरित केली आहे. मात्र शासन स्तरावरून आवश्यक तो निधी उपलब्ध झाला नसल्याने सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलचा प्रश्न भिजत पडला आहे.