ड्रग फ्री इंडिया’ व रस्ता सुरक्षेचा संदेश; शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी सादर केली पथनाट्ये
रत्नागिरी (प्रतिनिधी) :
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमाच्या अनुषंगाने आणि ‘ड्रग फ्री इंडिया’ अभियानांतर्गत अमली पदार्थांविरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशाने काढण्यात आलेल्या ‘एकता परेड राष्ट्रीय मोटारसायकल रॅली’ चे रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले.
दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी गुजरात येथे संपन्न होणाऱ्या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ही रॅली आयोजित करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झालेल्या या रॅलीचे स्वागत जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या हस्ते रॅलीतील अधिकारी व अंमलदारांना पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. यावेळी ढोल-ताशा पथकाच्या गजरात या रॅलीचे जोरदार स्वागत झाले.
अमली पदार्थमुक्त समाजाचा संदेश
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या ‘मिशन फिनिक्स’ उपक्रमांतर्गत या रॅलीच्या माध्यमातून अमली पदार्थांचे सेवन, बाळगणे, विक्री व तस्करी यामुळे व्यक्ती, कुटुंब आणि समाजावर होणाऱ्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्यात आली. विशेषतः तरुण पिढीने अमली पदार्थांपासून दूर राहावे, व्यसनाधीनतेपासून स्वतःचे रक्षण करून निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करावा, असा संदेश उपस्थित विद्यार्थी, पालक व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आला.
या उपक्रमांतर्गत शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून अमली पदार्थांच्या दुष्परिणामांचे प्रभावी चित्रण केले आणि नागरिकांना अमली पदार्थमुक्त समाज घडविण्याचे आवाहन केले.
रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती
मोटारसायकल रॅलीच्या निमित्ताने रस्ता सुरक्षेचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले. वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करणे, वेगमर्यादेचे पालन करणे, मद्यपान किंवा अमली पदार्थांच्या प्रभावाखाली वाहन न चालविणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळणे आणि वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करणे याबाबत नागरिकांना जागरुक करण्यात आले.
विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतही स्वागत
रत्नागिरी शहरासह संगमेश्वर, चिपळूण आणि खेड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतही या राष्ट्रीय मोटारसायकल रॅलीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. रॅलीच्या जिल्ह्यातील प्रवासादरम्यान विविध ठिकाणी ‘ड्रग फ्री रत्नागिरी’, व्यसनमुक्त तरुणाई आणि सुरक्षित रस्ता वापराचा संदेश पोहोचवण्यात आला. जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आलेल्या उत्तम व्यवस्थापनाबद्दल रॅलीतील रायडर्सनी रत्नागिरी पोलिसांचे विशेष कौतुक व समाधान व्यक्त केले.
Home महत्वाच्या बातम्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरीत ‘एकता परेड राष्ट्रीय मोटारसायकल रॅली’चे उत्साहात...












