उत्पादन शुल्क अधिकाऱ्याच्या कथित शिवीगाळीमुळे वाद; संबंधित अधिकाऱ्याची वैद्यकीय तपासणी व कायदेशीर कारवाईची मागणी
राजापूर (प्रतिनिधी) तालुक्यात गोवा बनावटीच्या दारूची विक्री आणि अवैध दारू व्यवसायाविरोधात तक्रार केल्यानंतर उत्पादन शुल्क विभागातील एका अधिकाऱ्याने कथितरीत्या शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप करत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी लांजा येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. संबंधित अधिकाऱ्याची वैद्यकीय तपासणी करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, या प्रकरणी संबंधित दुय्यम निरीक्षक यांची महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ नुसार पुढील कारवाई करिता प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात सादर करण्याचे लेखी आश्वासन राज्य उत्पादन शुल्क विभाग रत्नागिरीच्या अधीक्षक कीर्ती शेडगे यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांना दिले आहे.
राजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीच्या दारूची विक्री होत आहे. भाजपचे युवा तालुकाध्यक्ष सिद्धेश थळेश्री यांनी नाटे गावातील गोवा बनावटीच्या दारूच्या संदर्भात उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक सी. एल. कदम यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तक्रार केली होती. मात्र, या तक्रारीला उत्तर देताना संबंधित अधिकाऱ्याने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप थळेश्री यांनी केला आहे. तसेच, अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याबाबतही संबंधित अधिकाऱ्याने मी कारवाई करायचा ठेका घेतला काय? असे आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत सिद्धेश थळेश्री यांनी भाजपा जिल्हा सरचिटणीस व राजापूर पंचायत समितीचे उपसभापती अभिजीत गुरव यांना दूरध्वनीवरून घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यावेळी अभिजीत गुरव यांनी संबंधित उत्पादन शुल्क अधिकाऱ्याशी संपर्क साधून या प्रकाराबाबत विचारणा केली. मात्र, त्यांनाही कदम यांन शिवीगाळ केली. तसा आरोप गुरव यांनी केला आहे. संबंधित अधिकाऱ्याशी दूरध्वनीवरून बोलताना तो दारूच्या नशेत असल्याचा संशय आल्याचे अभिजीत गुरव यांनी सांगितले. या प्रकरणी त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग रत्नागिरीच्या अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्याकडे तक्रार करून संबंधित अधिकाऱ्याची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी आणि प्रकरणाची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली होती.
या घटनेच्या निषेधार्थ उपसभापती अभिजीत गुरव, नाटे गावचे सरपंच संदीप बांधकर, सचिन बांदकर, सिद्धेश थळेश्री भाजपचे लांजा तालुकाध्यक्ष विराज हरमळे, राजापूर तालुकाध्यक्ष मोहन घुमे, सरचिटणीस बेंडले आणि माजी नगरसेवक संजय यादव, यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लांजा येथील उत्पादन शुल्क कार्यालयासमोर ठिय्या मांडला. जोपर्यंत आपल्या मागणी संदर्भात कार्यवाही होत नाही आणि संबंधित वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष भेट देऊन आमचे म्हणणे ऐकून घेत नाहीत तोपर्यंत आपण ठिय्या आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली.
भाजपा पदाधिकाऱ्यांच्या या आंदोलनाची दखल घेत रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी अमित पाडाळकर यांनी लांजा येथे येऊन आंदोलकांची भेट घेतली आणि पुढील कार्यवाहीबाबत लेखी पत्र दिले. पुढील चार दिवसांत राजापूर तालुक्यात गोवा बनावटीच्या दारूविक्रीविरोधात छापे टाकून अवैध दारू व्यवसायावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्याचे अभिजीत गुरव यांनी सांगितले.
तालुक्यातील चालणाऱ्या गोवा बनावटीच्या दारूचा अवैध व्यवसायाबाबत कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर जबाबदार अधिकाऱ्यांकडून तक्रारदारांना शिवीगाळ केली जात असेल तर जनतेने न्याय कोणाकडे मागायचा? लोकप्रतिनिधींनाच अशा प्रकारच्या भाषेचा सामना करावा लागत असेल, तर हे कदापि सहन केले जाणार नाही, असा इशारा अभिजीत गुरव यांनी दिला.
तसेच पुढील १५ दिवसांत राजापूर तालुक्यातील गोवा बनावटीच्या दारूचा अवैध व्यवसाय बंद झाला नाही, तर तालुक्यातील तरुणाईला सोबत घेऊन व्यापक आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा गुरव यांनी दिला आहे.













