राजापूर पोलिसांची धडक कारवाई: दुचाकीवरून चालणारी अवैध गोवा बनावटीची दारू तस्करी उघडकीस

राजापूर :
राजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी राबवलेल्या धडक कारवाईदरम्यान बेकायदेशीरपणे गोवा बनावटीची दारू आणि दुचाकीची वाहतूक करणाऱ्या एका तस्कराला जेरबंद करण्यात आले आहे. रोहित शिवाजी खानविलकर (वय २६, रा. खडपेवाडी, राजापूर, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) असे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दिनांक ०९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११.१५ वाजण्याच्या सुमारास राजापूरमधील गुजराळी दातार छापखाना ते साखळकरवाडी जाणाऱ्या रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. आरोपी रोहित खानविलकर हा आपल्या ताब्यातील टीव्हीएस ज्युपिटर (TVS JUPITER) कंपनीच्या आकाशी रंगाच्या दुचाकीवरून (रजि. नं. MH-08-BH-4768) कसलाही परवाना नसताना गोवा बनावटीच्या विदेशी दारूची बेकायदेशीर वाहतूक व अवैध साठा करत असताना मिळून आला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी एकूण ८३,०२०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये ५०,०००/- रुपये किमतीची दुचाकी, ७,२००/- रुपये किमतीची ‘हेवर्ड्स फाईन विस्की’ (HAYWARDS FINE WHISKY) गोवा बनावटीची दारू असलेले ५ बॉक्स (प्रत्येक बॉक्समध्ये १८० मिली मापाच्या ४८ बाटल्या), ७,८२०/- रुपये किमतीची ‘मॅక్‌डॉवेल नं. १’ (MCDOWELLS NO.1) कंपनीची गोवा बनावटीची दारू (एका बॉक्समध्ये १८० मिलीच्या ४८ बॉटल व दुसऱ्या बॉक्समध्ये १८० मिलीच्या ४४ बॉटल), तसेच ८,०००/- रुपये किमतीचा ओप्पो (OPPO F19) कंपनीचा सिल्व्हर रंगाचा मोबाईल आणि १०,०००/- रुपये किमतीचा सॅमसंग गॅलक्सी (SAMSUNG GALAXY A 35) कंपनीचा पांढऱ्या रंगाचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रथमेश प्रकाश वारीक (पोलीस कॉन्स्टेबल/१६२५, नेमणूक- राजापूर पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दिली असून, राजापूर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ), (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.