कलंबिस्त हायस्कूलमध्ये विजय कदम मित्रमंडळ व पोलीस करीअर ॲकॅडमीतर्फे करिअर मार्गदर्शन शिबीर संपन्न

​कलंबिस्त । प्रतिनिधी :
कलंबिस्त येथील कलंबिस्त इंग्लिश स्कूलमध्ये विजय कदम मित्रमंडळ व पोलीस करीअर ॲकॅडमी, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.
​कार्यक्रमाच्या व्यासपीठावर पोलीस करीअर अकॅडमीचे संचालक तथा सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सतीश कविटकर, मार्गदर्शक ऋतुराज तळवणेकर, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक कृष्णा गावडे, आयोजक विजय कदम, प्रशालेचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव आणि ज्येष्ठ शिक्षक धनराज सजगुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
​कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सतीश कविटकर यांनी या मार्गदर्शन शिबिराच्या आयोजनामागचा उद्देश, त्याची गरज व महत्त्व विशद केले. पोलीस करीअर अकॅडमीच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी आज शासकीय सेवेत कार्यरत आहेत. तालुक्यातील विद्यार्थ्यांनीही या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन आपले उज्ज्वल भविष्य घडवावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
​त्यानंतर ॲकॅडमीचे मार्गदर्शक तथा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे कर्मचारी ऋतुराज तळवणेकर यांनी आपल्या खुमासदार शैलीत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. उत्तम करिअर घडवण्यासाठी शालेय जीवनापासूनच मेहनत, चिकाटी, सातत्यपूर्ण अभ्यास आणि योग्य नियोजनासह स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, याविषयी त्यांनी अनेक अनुभवजन्य दाखले देत मार्गदर्शन केले. तसेच ॲकॅडमीचे मार्गदर्शक व सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक कृष्णा गावडे यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना नेमकी कोणती काळजी घ्यावी आणि करिअरच्या विविध संधींचा कसा शोध घ्यावा, याबाबत उपयुक्त माहिती दिली.
​या शिबिराला कलंबिस्त हायस्कूलचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, सांगेली ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी तसेच माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुटसुटीत सूत्रसंचालन प्रशालेचे शिक्षक किशोर वालावलकर यांनी केले, तर उपस्थित सर्व मार्गदर्शक, आयोजक विजय कदम मित्रमंडळ आणि विद्यार्थ्यांचे आभार मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांनी मानले.