जुनी नळपाणी योजना दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
मंडणगड : तालुक्यातील भिंगळोली गावात पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन, गावातील नळपाणी योजनेची दुरुस्ती करून पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी विभागाचे महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी व माजी उपसरपंच ॲड. राकेश रविंद्र साळुंखे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या मंडणगड शाखेच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, भिंगळोली गावासाठी प्रस्तावित जलजीवन योजनेचे काम अद्याप सुधारित स्वरूपात प्रस्तावित करण्यात आलेले नाही. यापूर्वी मंजूर योजनेअंतर्गत केवळ महादुर्गवाडी येथे विहिरीचे खोलीकरण, आरसीसी साठवण टाकी तसेच मुख्य पाइपलाइनची कामे करण्यात आली आहेत. मात्र, संपूर्ण ग्रामपंचायत हद्दीत इतर कोणतीही कामे झालेली नाहीत.
गावाची वाढती लोकसंख्या आणि अनेक वर्षांपासून वापरात असलेली जुनी नळपाणी योजना यामुळे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणीटंचाई जाणवू लागते. यंदा मात्र डिसेंबर महिन्यापासूनच पाणीटंचाई सुरू होण्याची शक्यता असून, त्यावर वेळीच उपाययोजना करण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
जुन्या नळपाणी योजनेची दुरुस्ती करण्याची मागणी
गावातील जुन्या नळपाणी योजनेच्या मुख्य जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागली असून, मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. ही गळती तातडीने दुरुस्त करून पाण्याचा अपव्यय थांबवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच महादुर्गवाडी येथील साठवण टाकी व उद्भव येथील मुख्य जलवाहिनी पूर्ण करण्यात आली असली, तरी पूर्वीची मुख्य जलवाहिनी व पंप काढून टाकण्यात आल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे नवीन जलवाहिनीचे काम पूर्ण होईपर्यंत आवश्यक पंप बसवून सद्यस्थितीत पाणीपुरवठा तातडीने सुरू करावा, जेणेकरून तेथील दुग्ध व्यवसाय करणारे गोर गरीब नागरिक व जनावरांना पाण्याची टंचाई होणार नाही अशी मागणीही करण्यात आली आहे.
गावातील नागरिकांना संभाव्य पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी संबंधित विभागाने तातडीने लक्ष घालून आवश्यक दुरुस्तीची कामे करावीत, अशी मागणी माजी उपसरपंच ॲड. राकेश रविंद्र साळुंखे यांनी केली आहे.












