महादेवाचे केरवडे येथे दुर्ग मावळा प्रतिष्ठान आणि निसर्ग संवर्धन संस्थांतर्गत वनराई बंधारा

सावंतवाडी । प्रतिनिधी : ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी महादेवाचे केरवडे गावातील तुळशीचे गाळू येथे वनराई बंधाऱ्याची उभारणी करण्यात आली आहे. दुर्ग मावळा प्रतिष्ठान व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था यांच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या ऐतिहासिक पर्यावरण संवर्धन व विकास समितीच्या माध्यमातून हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. पावसाचे पाणी वाहून जाण्यापासून रोखणे, पाण्याचा स्थानिक पातळीवर साठा निर्माण करणे आणि जमिनीत पाणी मुरण्यास मदत करणे या मुख्य उद्देशाने हा बंधारा बांधण्यात आला असून, बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाचे असे छोटे उपक्रम भविष्यात अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

या उपक्रमात संस्थेच्या बारा सदस्यांनी प्रत्यक्ष सहभागी होत आपले श्रमदान केले. सामाजिक बांधिलकी जपत निसर्ग संवर्धनासाठी प्रत्यक्ष कृती करण्याचा आदर्श या सदस्यांनी घालून दिला आहे. पर्यावरण संवर्धनासाठी केवळ जनजागृती पुरेशी नसून प्रत्यक्ष श्रमदान आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता आहे, हा महत्त्वपूर्ण संदेश याद्वारे देण्यात आला. या वनराई बंधाऱ्यामुळे पाण्याचा प्रवाह काही काळ अडविण्यास आणि भूजल पुनर्भरणास मोठी मदत होणार असून, याद्वारे स्थानिकांमध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती निर्माण करण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे.

दुर्ग मावळा प्रतिष्ठान आणि नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था यांच्या माध्यमातून ऐतिहासिक वारशाचे जतन, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक विकास यांची सांगड घालण्याचे स्तुत्य कार्य सुरू आहे. गावागावांत अशा प्रकारचे वनराई बंधारे, वृक्षारोपण, जलस्रोतांची स्वच्छता आणि पाणी बचतीचे उपक्रम राबविल्यास पर्यावरण संवर्धनाला मोठी चालना मिळू शकते. स्थानिक नागरिक आणि युवकांनी अशा उपक्रमांत पुढाकार घेतल्यास आगामी काळात पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी स्थानिक स्तरावर नक्कीच मदत होईल. “पाणी अडवा, पाणी जिरवा; निसर्ग जपा, भविष्य घडवा!” या संदेशाची अनुभूती देणारा महादेवाचे केरवडे येथील तुळशीच्या गाळूवर उभारण्यात आलेला हा वनराई बंधारा जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक अत्यंत सकारात्मक पाऊल ठरले आहे.