टीचर कॉलनी सोसायटीच्या कामाची चौकशी होणार : नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांचा इशारा

सावंतवाडी :
​सावंतवाडी येथील न्यू सबनिसवाडा, टीचर कॉलनी सोसायटीमधील नागरिकांची बिल्डरने फसवणूक केल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. नगरपरिषदेचे पाणी कनेक्शन विहिरीचे पाणी असल्याचे सांगून बिल्डरने दिशाभूल केल्याने येथे पाण्याची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे.

​या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी नागरिकांची भेट घेऊन धीर दिला. प्रशासकीय काळात बिल्डरला ‘ओसी’ (भोगवटा प्रमाणपत्र) कशी मंजूर झाली, या संपूर्ण कामकाजाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. लहान मुले व ज्येष्ठांचे हाल होत असल्याने उद्याच पिण्याच्या पाण्याची सोय नगरपरिषदेकडून केली जाईल, असा विश्वास पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांनी दिला. यावेळी सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, दिपाली भालेकर, सुनिता पेडणेकर, ॲड. सिद्धार्थ भांबुरे व रहिवासी उपस्थित होते.