देवरूख (प्रतिनिधी):
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळावे आणि पुस्तकांशी मैत्री दृढ व्हावी, या उद्देशाने महाविद्यालयाच्या स्व. आबासाहेब व कमलाबाई सरदेशपांडे ग्रंथालय व मराठी विभागाच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचा शुभारंभ भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमापूजनाने व अभिवादनाने प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी केला.
प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नियमित वाचनामुळे ज्ञानाचा विस्तार होतो, विचारांना योग्य दिशा मिळते आणि व्यक्तिमत्त्व अधिक समृद्ध होते, असे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील उपलब्ध साधनसंपत्तीचा अधिकाधिक उपयोग करून नियमित वाचनाची सवय जोपासावी, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. डॉ. सुभाष मायंगडे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी डॉ. कलाम यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचे महत्त्व विशद केले. आजच्या मोबाईल आणि डिजिटल युगात विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करणे, ज्ञानाची ओढ वाढविणे आणि पुस्तकांशी मैत्री दृढ करणे ही काळाची गरज असल्याचे प्रा. डॉ. मायंगडे यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांसाठी ‘वाचन मार्गदर्शन कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत डॉ. वर्षा फाटक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वाचनाचे महत्त्व, वाचनाची प्रभावी पद्धत आणि नियमित वाचनाची सवय विकसित करण्याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांसाठी वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपले वाचनकौशल्य सादर केले. महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी व गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरीच्या मराठी विषयाच्या प्रा. डॉ. निधी पटवर्धन यांनी आपल्या ‘भाषा निधी’ या युट्युब चॅनेलची कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ओळख करून देत, त्याचे महत्त्व स्पष्ट केले. मराठी भाषेतील शब्दांचे विविध अर्थ, समानार्थी शब्द तत्सम व तद्वत शब्द, विद्यार्थ्यांच्या नावांचे व आडनावांचे अर्थ, म्हणी, वाक्प्रचार यांविषयी रंजक पद्धतीने माहिती दिली. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्यांच्या भाषिक ज्ञानाची चाचणी घेत, त्यांनी कार्यशाळा संवादात्मक व उत्साहपूर्ण केली.
‘वाचन प्रेरणा दिना’निमित्त ग्रंथालयात ‘पुस्तक प्रदर्शना’चे आयोजन करण्यात आले होते. भारतरत्न डॉ. कलाम यांनी लिहिलेल्या विविध प्रेरणादायी ग्रंथांसह, त्यांच्या जीवनकार्यावर, विचारांवर आणि वैज्ञानिक योगदानावर आधारित पुस्तकांचा, तसेच व्यक्तिमत्व विकास, प्रेरणादायी साहित्य, कथा व कादंबऱ्या, चरित्रे व आत्मचरीत्रे, तसेच सामाजिक शैक्षणिक व वैचारिक विषयांवरील विविध ग्रंथांचा व पुस्तकांचा यामध्ये समावेश होता. ग्रंथालयात नव्याने दाखल झालेली पुस्तकेही या प्रदर्शन मांडण्यात आली होती. विद्यार्थी व शिक्षकांनी या ग्रंथ प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित करत स्वतःच्या जीवनातील वाचनानुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. अजित जाधव यांनी केले. ‘वाचन प्रेरणा दिना’निमित्त विद्यार्थ्यांसाठी ‘निबंध लेखन स्पर्धा’ व ‘पुस्तक परीक्षण स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. सर्व कार्यक्रम व उपक्रमांच्या यशस्वितेसाठी ग्रंथपाल प्रा. डॉ. सुभाष मायंगडे, सहाय्यक स्वप्नील कांगणे, सचिन दांडेकर, रोशन गोरुले तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले. सर्व कार्यक्रम व उपक्रमांच्या आयोजनाचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक यांनी आयोजकांचे कौतुक केले.













