आंबा व काजू बागांच्या संरक्षणासाठी कृषी विद्यापीठाचा मोलाचा सल्ला; पालवीचे कीड-रोगांपासून संरक्षण करण्याचे आवाहन

रत्नागिरी : कोकणातील प्रमुख फळपिके असलेल्या आंबा आणि काजू बागांमध्ये सध्या पालवी फुटण्याचा आणि वाढीचा संवेदनशील काळ सुरू आहे. बदलत्या हवामानात या पालवीचे कीड व रोगांपासून रक्षण करून पुढील हंगामातील मोहर प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयाने २४ ते ३० ऑक्टोबर २०२६ या कालावधीकरिता महत्त्वपूर्ण कृषी सल्ला जारी केला आहे.
आंबा बागांचे व्यवस्थापन व फवारणी:
अनेक बागांमध्ये मोठ्या प्रमाणावर नवी पालवी आली असून, काही ठिकाणी पालवी फुटण्यास सुरुवात झाली आहे. कोवळ्या पालवीतील रस तुडतुड्यांनी शोषल्यास नुकसान होते व चिकटा पडून काळी बुरशी वाढण्याचा धोका संभवतो. तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी प्रति १० लिटर पाण्यात डेल्टामेथ्रीन ९ मि.ली. आणि २३ ऑक्टोबर रोजी झालेल्या पावसामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसल्यास थायोफिनेट मिथाईल १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून विद्यापीठाने शिफारस केलेली फवारणी करावी.
औषध पालवीवर नीट पसरून टिकून राहावे यासाठी द्रावणात ‘स्टीकर’ किंवा ‘स्प्रेडर’ मिसळावे.
कोवळ्या फुटीवर शेंडे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळल्यास टोलफेन पायराईड २० मि.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. ढगाळ वातावरणामुळे तुडतुड्यांची उत्पत्ती वाढून चिकटा पडू नये म्हणून दक्षता घ्यावी.
पालवी सशक्त आणि लवकर जून होण्यासाठी ०:०:५० किंवा १३:०:४५ ही पाण्यात विरघळणारी सूक्ष्म अन्नद्रव्ये स्वतंत्रपणे ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारावीत.
काजू बागांची काळजी:
काजूच्या वेंगुर्ला-१, वेंगुर्ला-४, वेंगुर्ला-७, वेंगुर्ला-९ आणि वेंगुर्ला-१० या वाणांना नवीन पालवी येण्यास सुरुवात झाली असून, वेंगुर्ला-१० व वेंगुर्ला-१ च्या काही झाडांना मोहरही दिसू लागला आहे. पुढील १५ दिवसांत नव्या पालवीतून मोहर अधिक प्रमाणात येण्याची शक्यता आहे.
ढगाळ हवामानात ढेकण्या किडीपासून संरक्षण मिळवण्यासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ६ मि.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी झाडांच्या बुंध्याभोवती जैविक आच्छादन (मल्चिंग) करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
हवामानाची स्थिती:
मागील आठवड्यात काही भागात तुरळक पाऊस व पहाटे अल्प प्रमाणात गारवा जाणवला. कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २१ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. बागायतदारांनी हवामानातील बदलांनुसार योग्य उपाययोजना कराव्यात, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
(अधिक तांत्रिक माहिती व सल्ल्यासाठी कृषी विद्यापीठातील डॉ. वैभव शिंदे यांच्याशी ९४२२४२५७२७ या क्रमांकावर संपर्क साधावा.)