घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयात डॉ. के. एच. घरडा मेमोरियल राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नमंजुषा स्पर्धा

खेड (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यातील घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लवेल येथील रासायनिक अभियांत्रिकी विभाग, IIChE स्टुडंट चॅप्टर आणि घरडा केमिकल्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. के. एच. घरडा मेमोरियल राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा प्रसिद्ध रसायन अभियंता आणि समाजकार्यकर्ते डॉ. के. एच. घरडा यांच्या स्मरणार्थ दरवर्षी आयोजित केली जाते. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासोबतच अभियांत्रिकी शिक्षणातील उत्कृष्टता, नवकल्पना आणि विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना देणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे. या वर्षी देशभरातून तब्बल २५ संघांनी उत्साहपूर्वक नोंदणी करून स्पर्धेत सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे. प्रश्नमंजुषेमध्ये बहुपर्यायी प्रश्न, संक्षिप्त उत्तरे, जलद फेरी तसेच दृक्-प्रश्न अशा विविध टप्प्यांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रश्नांचा आवाका रासायनिक अभियांत्रिकी तसेच संबंधित शाखांमधील विविध विषयांवर आधारित असणार आहे.
ही स्पर्धा मंगळवार, दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता सुरू होऊन सायंकाळी ५ वाजेपर्यंत संपन्न होणार आहे. या सांघिक स्पर्धेमध्ये प्रत्येक संघामध्ये जास्तीत जास्त चार विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी उपलब्ध आहे. विजेत्या संघासाठी प्रथम पारितोषिक रु. २५,०००/-, द्वितीय पारितोषिक रु. २०,०००/- आणि तृतीय पारितोषिक रु. १५,०००/- असे ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त संघांनी सहभाग नोंदवून आपले कौशल्य सिद्ध करावे, असे आवाहन घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.