वारगावात महिलांसाठी रोजगार मार्गदर्शन व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

सरपंच नाना शेट्ये यांच्या संकल्पनेतून सामाजिक बांधिलकीचा उपक्रम

कणकवली : तालुक्यातील वारगाव येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रेरणेतून आणि सरपंच नाना शेट्ये यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी रोजगार मार्गदर्शन तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीचा उपक्रम राबविण्यात आला. दुष्काळजन्य परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याच्या उद्देशाने सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम आयोजित केल्याची माहिती सरपंच नाना शेट्ये यांनी दिली.

 

वारगाव ग्रामपंचायत, अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि स्वयंसेविका यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक शाळेत सरस्वती पूजनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य राजेश उर्फ राजा जाधव, ग्रामविकास अधिकारी देवेंद्र नलावडे, शिक्षकवृंद आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

 

यावेळी पंचायत समिती सदस्य राजेश उर्फ राजा जाधव यांनी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नागरिकांनी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन केले. तसेच शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

 

सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विजेत्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली. यामध्ये गावरान अंडी देणारी कोंबडी, खाद्यतेल, सुती विणलेल्या साड्या आणि कापडी शर्ट यांचा समावेश होता. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना या बक्षिसांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना तळगावकर यांनी केले.