खारेपाटणमध्ये NCMC कार्डसाठी महिलांची गर्दी

तीन तास रांगेत ताटकळत

एकाच एजंटवर जबाबदारी; ज्येष्ठ महिलांसाठी बसण्याची व्यवस्था नसल्याने नाराजी

नियोजनावर प्रश्नचिन्ह

खारेपाटण / कणकवली : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस प्रवासात महिलांना तिकिटाच्या दरात ५० टक्के सवलत मिळवून देण्याच्या उद्देशाने आवश्यक असलेल्या NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) च्या ऑनलाइन नोंदणीसाठी बुधवारी २८ ऑक्टोबर रोजी खारेपाटण एसटी बसस्थानकात आयोजित करण्यात आलेल्या विशेष शिबिराला दशक्रोशीतील महिलांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, कार्ड वितरणासाठी एसटी महामंडळाने नियुक्त केलेला खासगी एजंट एकच असल्याने शिबिरात नियोजनाचा अभाव दिसून आला. सुमारे २०० हून अधिक महिला या शिबिरासाठी उपस्थित होत्या. यामध्ये ज्येष्ठ महिलांची संख्या लक्षणीय होती. कार्ड मिळविण्यासाठी महिलांना सलग तीन तास रांगेत उभे राहून प्रतीक्षा करावी लागल्याने महिला प्रवाशांसह नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

 

एसटी महामंडळाच्या वतीने महिला प्रवाशांसाठी सवलतीच्या कार्डची नोंदणी व वितरण करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले असले, तरी त्या ठिकाणी होणाऱ्या गर्दीचा विचार करून आवश्यक मनुष्यबळ आणि सोयीसुविधांची व्यवस्था करणे अपेक्षित होते. मात्र, एकाच एजंटवर संपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आल्याने कार्ड मिळविण्यासाठी महिलांना बराच वेळ रांगेत उभे राहावे लागले. त्यातच बसस्थानकावर महिलांना बसण्यासाठी कोणतीही स्वतंत्र व्यवस्था नसल्याने ज्येष्ठ महिलांचे विशेष हाल झाले.

 

महिला प्रवाशांना प्रवासात सवलत मिळावी, या उद्देशाने राबविण्यात येणारा उपक्रम निश्चितच स्वागतार्ह आहे. मात्र, या सुविधेचा लाभ घेण्यासाठी महिलांना तासनतास रांगेत उभे राहण्याची वेळ येत असेल, तर शिबिराच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण होते. गर्दीचे योग्य व्यवस्थापन, पुरेसे कर्मचारी, बसण्याची व्यवस्था आणि ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देणे आवश्यक होते. रांगेत उभे असताना एखाद्या ज्येष्ठ महिलेला चक्कर येऊन पडल्यास किंवा प्रकृती बिघडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल उपस्थित करत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. भविष्यात अशा शिबिरांचे आयोजन करताना एसटी महामंडळाने पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासह महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक सोयीसुविधांची व्यवस्था करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.