मालवण, वेंगुर्ल्याच्या तुलनेत देवगड पर्यटनात मागे; स्थानिक रोजगाराच्या संधींवर होणार विचारमंथन
गुरुवारी सायंकाळी ५ वाजता शासकीय विश्रामगृहात आयोजन; युवक, ग्रामस्थ आणि पर्यटन व्यावसायिकांना सहभागी होण्याचे आवाहन
देवगड : प्रतिनिधी
देवगड तालुक्याला निसर्गरम्य समुद्रकिनारे, सुंदर खाड्या, ऐतिहासिक पर्यटनस्थळे आणि प्रसिद्ध धार्मिक स्थळांचे वैभव लाभले आहे. मात्र, पर्यटनासाठी मोठी क्षमता असूनही मालवण आणि वेंगुर्ल्याच्या तुलनेत देवगडचा पर्यटन विकास अपेक्षेइतका झालेला नाही. या पार्श्वभूमीवर ‘पर्यटन वाढवूया, देवगड घडवूया’ या संकल्पनेतून तालुक्यातील युवकांसाठी गुरुवार, २९ ऑक्टोबर रोजी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
देवगड तालुक्यातील अनेक युवक शहरातील नोकरी सोडून आपल्या गावात, कुटुंबासोबत राहून स्वयंरोजगार उभारण्याचा प्रयत्न करीत आहेत. पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगार आणि व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात. मात्र, असे व्यवसाय सुरू करताना युवकांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. या अडचणींवर सामूहिक विचारविनिमय करून व्यवहार्य उपाय शोधण्याची गरज या चर्चासत्राच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आली आहे.
चर्चासत्रात देवगडमधील पर्यटनाच्या उपलब्ध संधी, ग्रामस्थ आणि पर्यटन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या व्यक्तींमध्ये समन्वय कसा साधता येईल, यावर चर्चा होणार आहे. तसेच किनारी भागात पर्यटन व्यवसायाचा विस्तार करताना पारंपरिक मच्छीमारांचे हित जपत पर्यटन व्यावसायिकांशी समतोल कसा राखता येईल, यावरही विचारमंथन केले जाणार आहे.
स्थानिक युवकांनी स्वतःच्या गावात राहून व्यवसाय सुरू करावेत का, त्यासाठी आवश्यक सुविधा कोणत्या असाव्यात आणि स्थानिक पातळीवर पर्यटनपूरक उपक्रमांना कशा प्रकारे पाठबळ देता येईल, हेही चर्चेचे महत्त्वाचे विषय असतील. संकुचित राजकारण आणि अनावश्यक मतभेद बाजूला ठेवून देवगडच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आयोजकांनी व्यक्त केली आहे.
देवगडच्या पर्यटनाला नवी दिशा देणे, स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि ग्रामस्थ, मच्छीमार व पर्यटन व्यावसायिक यांच्यात सहकार्याचे वातावरण निर्माण करणे, हा या चर्चासत्रामागील प्रमुख उद्देश आहे. तालुक्यातील युवकांनी, ग्रामस्थांनी आणि पर्यटन क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असणाऱ्यांनी या चर्चासत्रात सहभागी होऊन आपली मते व सूचना मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
हे चर्चासत्र गुरुवार, २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता देवगड येथील पवनचक्की रोडवरील शासकीय विश्रामगृहात होणार आहे.
‘पर्यटन वाढवूया, देवगड घडवूया’ या ध्येयाने देवगडच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि युवकांच्या रोजगारासाठी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.










