उमेदच्या कारभारावरून सभापती सिद्धेश रावराणे आक्रमक
वैभववाडी पं स. ची मासिक सभा संपन्न
वैभववाडी l प्रतिनिधी : तालुक्यातील बचत गटांना केवळ पापड आणि लोणचे तयार करण्यापुरते मर्यादित ठेवू नका. उमेद अभियानाच्या अधिकाऱ्यांचे बचत गटांकडे दुर्लक्ष होत असून, केवळ कागदोपत्री कामकाज करण्याचे प्रकार आता बंद करा, अशा शब्दांत पंचायत समितीचे सभापती सिद्धेश रावराणे यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. प्रशासकीय राजवट संपली असून, आता कामकाजात ठोस सुधारणा दिसली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. उमेद अभियानातील अनियमितता, ऐनारी ग्रामपंचायतीचा कारभार, वीजपुरवठा आणि वनराई बंधाऱ्यांच्या उभारणीसह विविध प्रश्नांवर वैभववाडी पंचायत समितीच्या मासिक सभेत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.
वैभववाडी पंचायत समितीची मासिक सभा सभापती सिद्धेश रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसभापती साची कोलते, सदस्य साधना नकाशे, देवानंद पालांडे, गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ, सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीमती माने यांच्यासह विविध विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते.
ऐनारी ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करा
तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती साहित्य खरेदीसाठी जिल्ह्याबाहेरील भुदरगड तालुक्याची निवड करतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच कोल्हापूरसारख्या मोठ्या बाजारपेठेतून खरेदी करण्याऐवजी भुदरगडमधूनच साहित्य खरेदी करण्यामागचे नेमके कारण काय, असा सवाल सदस्य देवानंद पालांडे यांनी उपस्थित केला.
ऐनारी ग्रामपंचायतीने खरेदी केलेल्या साहित्याचे वाटप करण्यासाठी वर्षभराचा कालावधी का लागतो, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतरच साहित्य खरेदी करून त्याचे वाटप केले जात असेल, तर हा कारभार योग्य आहे का, अशी विचारणा त्यांनी केली.
ग्रामस्थांना त्यांच्या हक्काच्या साहित्याच्या वाटपासाठी उपोषण करावे लागणे ही गंभीर बाब आहे. कर्मचाऱ्यांच्या चुकांमुळे तालुक्याची बदनामी होत असेल, तर त्याला जबाबदार कोण? प्रशासनाकडून दर महिन्याला आढावा घेतला जात असताना असे प्रकार कसे घडतात. असा सवाल पालांडे यांनी केला. ऐनारी ग्रामपंचायतीच्या कारभाराची सखोल चौकशी करून संबंधित ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.
ग्रामपंचायतींकडून साहित्य खरेदी करताना जीएसटीची बिले घेतली जातात. मात्र, संबंधित जीएसटी प्रत्यक्षात भरला जातो का आणि त्यासाठी घेतलेल्या रकमेचे नेमके काय होते, याचीही चौकशी होणे आवश्यक असल्याचे पालांडे यांनी सांगितले.
उमेदच्या कामकाजावर सदस्यांची नाराजी
तालुक्यातील उमेद अभियानाच्या कामकाजावर सभापतींसह सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. इतर तालुक्यांमध्ये बचत गटांचे काम चांगल्या प्रकारे सुरू असताना वैभववाडी तालुक्यातच गलथान कारभार का, असा संतप्त सवाल सभापती रावराणे यांनी उपस्थित केला.
उपसभापती साची कोलते यांनीही उमेदच्या अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला. उमेदचे अधिकारी बैठकांचे आयोजन करून पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करतात; मात्र स्वतःच बैठकीला उपस्थित राहत नाहीत. हा प्रकार योग्य नसून, पदाधिकाऱ्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
तालुक्यातील कामकाजात ताळमेळ नसून सभागृहाला चुकीची माहिती दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावर सभापती रावराणे यांनी चुकीची आकडेवारी देऊन सभागृहाची दिशाभूल करणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा दिला. केवळ वरवरची माहिती देण्याऐवजी प्रत्यक्ष कामकाजात सुधारणा करा, अशा शब्दांत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सुनावले.
आठ ते दहा तास वीजपुरवठा बंद ठेवण्यावर आक्षेप
वीज वितरण कंपनीकडून देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली आठ ते दहा तास वीजपुरवठा बंद ठेवला जात असल्याबद्दल सभापती रावराणे यांनी नाराजी व्यक्त केली. एवढा वेळ वीजपुरवठा बंद राहिल्यास नागरिकांनी आपली दैनंदिन कामे कशी करायची, असा सवाल त्यांनी केला.
सोमवार हा शासकीय कार्यालयांतील कामकाजाचा महत्त्वाचा दिवस असल्याने त्या दिवशी वीजपुरवठा बंद ठेवल्यास कार्यालयीन कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळे सोमवारऐवजी गुरुवारी देखभाल-दुरुस्तीसाठी वीजपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन करावे, अशी सूचना त्यांनी केली.
मांगवली पुनर्वसन गावठाण परिसरात गेल्या काही दिवसांपासून कमी-अधिक दाबाने वीजपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या विद्युत उपकरणांचे नुकसान होत आहे. या नुकसानीला जबाबदार कोण, असा प्रश्न देवानंद पालांडे यांनी उपस्थित केला. तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वीज वितरण कंपनीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.
जमीनमालकाच्या परवानगीशिवाय वीजखांब उभारण्यावर सवाल
वीज वितरण कंपनीकडून वीजखांब उभारताना संबंधित जमीनमालकाची परवानगी घेतली जात नसल्याचा मुद्दा पालांडे यांनी उपस्थित केला. जमीनमालकाची परवानगी न घेता खासगी जमिनीत वीजखांब उभारण्याचा अधिकार कंपनीला आहे का, असा सवाल त्यांनी केला. या प्रकरणी संबंधित विभागाने स्पष्ट भूमिका मांडून नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
पंचायत समितीच्या या मासिक सभेत उमेद अभियानाच्या कामकाजासह ग्रामपंचायतींचा कारभार आणि वीज वितरण कंपनीच्या कार्यपद्धतीवर सदस्यांनी प्रश्न उपस्थित करत प्रशासनाला जाब विचारला.













