वेंगुर्ले येथे उद्या महारक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन..

आमदार निलेश राणे यांची अडणार प्रमुख उपस्थिती..

वेंगुर्ले : प्रतिनिधी
शिवसेना, आदित्य सुभाष हळदणकर मित्रमंडळ आणि नाईक जिम अँड फिटनेस सेंटर, वेंगुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १ नोव्हेंबर रोजी सिद्धिविनायक मंगल कार्यालय वेंगुर्ले येथे महा रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे उपस्थित राहणार आहेत.

या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून रक्तदानाबरोबरच नागरिकांना विविध आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महा रक्तदान शिबिर सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत होणार आहे. तर आरोग्य शिबिर सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.

आरोग्य शिबिरामध्ये डॉ. गद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत नेत्रतपासणी व मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच डॉ. तन्वी गोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली दातांची तपासणी व मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय आयुष्मान भारत कार्ड विषयी माहिती, पीएम-जय योजनेअंतर्गत लाभ घेण्याची प्रक्रिया व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब भूषविणार आहेत.

रक्तदान हे श्रेष्ठदान असून, या सामाजिक उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे तसेच आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.