वेंगुर्ले येथे “प्रदर्शन व विक्री महोत्सवा”चे थाटात उद्घाटन..
इरनव्हील क्लब आणि लक्ष्मी आधार सेवा फाऊंडेशन चे आयोजन
वेंगुर्ले : दाजी नाईक
आजची स्त्री ही फक्त चुल आणि मुल एवढ्यापुरतीच मर्यादित राहिलेली नाही. तर ती विविध क्षेत्रांच्या माध्यमातून आकाशाला गवसणी घालत आहे. आपले घर, मुलं, प्रपंच आणि घरातील दैनंदिन कामे सांभाळून महिला अशाप्रकारचे स्टॉल लावत आहेत. समाजात उद्योजक म्हणून वावरत असताना त्या महिलांना पाठबळ देणे आमचे काम आहे. आम्ही सदैव महिलांच्या मागे खंबीरपणे उभे राहू असे अभिवचन सौ.वेदिका विशाल परब यांनी बोलताना दिले. वेंगुर्ले येथे इरनव्हील क्लब आणि लक्ष्मी आधार सेवा फाऊंडेशन आयोजित भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सव उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
दिवाळीचा सण अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर महिला उद्योजिकांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी वेंगुर्ला इरनव्हील क्लब आणि लक्ष्मी आधार सेवा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने साई मंगल कार्यालयात भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सवाला प्रारंभ झाला आहे. याचे उद्घाटन सौ.वेदिका परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत नर्मदा आई संस्थेच्या अध्यक्ष संध्या तेरसे, लक्ष्मी आधार सेवा फाऊंडेशनच्या अध्यक्ष ज्योती देसाई, खजिनदार डॉ.दिपाली देसाई, सदस्य शुभदा नवार, दिपाली अभ्यंकर, काजल गिरप, इरनव्हील क्लब वेंगुर्ले उपाध्यक्ष सई चव्हाण, सेक्रेटरी श्रीया परब, ट्रेझरर वृंदा गवंडळकर, सदस्य ॲड. अनुराधा वेर्णेकर, नगरसेवक ॲड. सुषमा प्रभूखानोलकर, आकांक्षा परब, रिया केरकर, काजल कुबल, डॉ.वसुधाज् योगा अॅण्ड फिटनेस अॅकॅडमीच्या डॉ.वसुधा मोरे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, सारस्वत बँकेचे मेनेजर साळगावकर, भाजपा दिव्यांग जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे, रसिका मठकर, हसिनाबेगम मकानदार डॉ.अनुश्री गावस्कर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना संध्या तेरसे यांनी लक्ष्मी आधार सेवा फाऊंडेशनच्या स्थापनेनंतर त्यांनी राबविलेला हा पहिलाच उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगून आपल्या नर्मदा आई संस्थेच्या कार्याबद्दल माहिती दिली. सद्यस्थितीत महिलांना रोजगार करताना शासनाच्या विविध योजना तसेच बचत गटांमधून आर्थिक सहाय्य मिळू लागले आहे. आता गरज आहे ही महिलांनी झेप घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची असे त्यांनी सांगितले. तर महिलांनी स्वत:ला कधीच कमी समजू नये. सध्याच्या काळात नोकरी मिळणे कठीण झाले आहे. जे नोकरी करताहेत ते टार्गेट, प्रपंच अशा ताणामध्ये अडकले आहेत. त्यामुळे महिलांनी रोजगार निर्मिती करून समाजाला हातभार लावावा असे आवाहन अॅड.सुषमा प्रभूखानोलकर यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्योती देसाई यांनी करताना त्यांनी आधार फाउंडेशन चा उद्देश उपस्थित समोर ठेवला. सूत्रसंचालन आणि आभार शुभम धुरी यांनी मानले.
या प्रदर्शन व विक्री महोत्सवात महिला बचत गट, गृहउद्योजिका आणि नवउद्योजिका यांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तू, गृहोपयोगी साहित्य, विविध उत्पादने आणि खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. हे प्रदर्शन आणि विक्री १ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन जास्तीत जास्त खरेदी करावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.












