नेपाळमध्ये सरिता कदम यांची सुवर्णभरारी!

​वर्ल्ड पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये तीन सुवर्णपदकांची कमाई

देवगड तालुक्याचा बहुमान वाढवला

​मसुरे | झुंजार पेडणेकर
डब्ल्यूपीआरएफ इंडिया पॉवरलिफ्टिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WRPF India Powerlifting Federation of India) अंतर्गत दिनांक ९, १० आणि ११ ऑक्टोबर २०२६ रोजी नेपाळ येथे पार पडलेल्या ‘वर्ल्ड पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिला खेळाडू सरिता कदम यांनी ऐतिहासिक यश संपादन केले आहे. त्यांनी या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत बेंच प्रेस (Bench Press), स्क्वॅट (Squat) आणि डेडलिफ्ट (Deadlift) या तिन्ही क्रीडा प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत तीन सुवर्णपदके पटकावली आहेत.
कदम यांचे माहेर शिरगांव तर सासर नारिंग्रे येथे आहे.

सरिता कदम या महिला व बालविकास विभागामध्ये ‘अंगणवाडी सेविका’ या पदावर कार्यरत आहेत. सेवेतील व्यस्तता आणिअल्प मानधन असतानाही, त्यांनी कठीण मेहनत आणि नियमित सराव याद्वारे जिद्दीने हे उच्च यश संपादन केले आहे.
सरिता कदम या शिरगाव हायस्कूलच्या माजी विद्यार्थिनी असून, त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे शिरगाव हायस्कूलसह संपूर्ण देवगड तालुक्याच्या शिरपेच मानाचा तुरा रोवला गेला आहे. ग्रामीण भागातून पुढे येत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या सरिता यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या यशाने शिरगाव हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांना तसेच परिसरातील नवोदित खेळाडूंना मोठी प्रेरणा मिळाली आहे.

​सरिता कदम यांच्या या प्रेरणादायी यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, भविष्यातही त्यांनी अशीच उत्तुंग भरारी घ्यावी, अशा सदिच्छा व्यक्त केल्या जात आहेत. पळसंब शाळा मुख्याध्यापक विनोद कदम यांच्या त्या मावस बहीण आहेत.