शिक्षकाच्या मागणीसाठी झाराप-कामळेवीर शाळेत पालकांकडून शाळा बंद आंदोलन

वेंगुर्ले : प्रतिनिधी

जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा झाराप-कामळेवीर येथे पदवीधर शिक्षक तत्काळ उपलब्ध व्हावा यासाठी पालक व विद्यार्थ्यांनी मंगळवारी शाळा बंद आंदोलन छेडून शासनाचे लक्ष वेधले.

९८ पटसंख्या असलेल्या या शाळेतील नियमित पदवीधर शिक्षिकेची सावंतवाडी येथे कामगिरीवर नियुक्ती करून शिक्षण विभागाने आमच्या शाळेवर अन्याय केला आहे. त्यामुळे आमच्या शाळेला मंगळवारपर्यंत शिक्षक न मिळाल्यास विध्यार्थ्यांसह शाळा बंद आंदोलन छेडू व दिवसभर उपोषण करू, असा इशारा यापूर्वीच शिक्षण विभागाला पालकांनी दिला होता. मात्र पालकांच्या या लेखी मागणीची दखल घेतली न गेल्यामुळे शालेय व्यवस्थापन समिती आणि पालकांनी मिळून मंगळवारी शाळा बंद आंदोलन छेडले.

या शाळेची एकूण पटसंख्या ९८ असून शाळेसाठी ५ शिक्षक मंजूर आहेत. मात्र, शाळेतील पदवीधर शिक्षिका श्रीमती अनघा अनिल निरवडेकर यांना सावंतवाडी तालुक्यातील शाळा नं. ४ मध्ये कामकाज शिक्षक म्हणून पाठविण्यात आले. त्यांच्याऐवजी वालावल बाधकोंड शाळेचे पदवीधर शिक्षक आशिष झणझणे यांची नेमणूक करण्यात आली, परंतु कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांचे समायोजन गोठोस शाळेत करण्यात आल्याचे समजते. सध्या झाराप-कामळेवीर शाळेत इयत्ता सहावी व सातवीचा पट ३७ असून शाळा सेमी इंग्रजी माध्यमाची आहे. सध्या शाळेत केवळ एकच पदवीधर शिक्षक कार्यरत असून त्यांच्याकडे मुख्याध्यापक पदाचा कार्यभारही आहे. पदवीधर शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असून, या नुकसानीस प्रशासन जबाबदार आहे, असे पालकांनी स्पष्ट मत आहे.

शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता विज्ञान विषयाचा पदवीधर शिक्षक तत्काळ उपलब्ध करून द्यावा, अन्यथा अनिश्चित काळासाठी शाळा बंद आंदोलन सुरु राहील, असा इशारा शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी दिला आहे.