BREAKING: स्टेअरिंग रॉड तुटला; चालकाचे नियंत्रण सुटले आणि बसचा अपघात झाला

गुहागरमध्ये कुडली-चिपळूण एसटी बसचा अपघात
चार प्रवासी किरकोळ जखमी

गुहागर प्रतिनिधी :
तालुक्यातील कुडली येथे मुक्कामी असलेली कुडली ते चिपळूण ही एसटी बस बुधवारी सकाळी शीर भाटले येथील आंबेकरवाडी परिसरात अचानक अपघातग्रस्त झाली. धावत्या बसचा स्टेअरिंग रॉड अचानक तुटल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात बसमधील चार प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. या घटनेमुळे एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
बुधवारी सकाळी कुडली येथून चिपळूणच्या दिशेने ही नियमित एसटी बस प्रवाशांना घेऊन मार्गस्थ झाली होती. सकाळच्या या फेरीत व्यापारी, नोकरदार, विद्यार्थी तसेच अन्य प्रवासी मोठ्या संख्येने प्रवास करत होते. त्यामुळे बसमध्ये नेहमीप्रमाणे प्रवाशांची वर्दळ होती. बस शीर भाटले येथील आंबेकरवाडी परिसरात पोहोचली असता अचानक बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याची घटना घडली.
धावत्या बसमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. काही क्षणांतच बस अनियंत्रित झाल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. नेमके काय घडले हे समजण्यापूर्वीच बस अपघातग्रस्त झाली. या घटनेत बसमधील चार प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने अपघाताची तीव्रता अधिक नसल्याने मोठी जीवितहानी टळली.