वनविभागाकडून घटनास्थळी पंचनामा व शवविच्छेदन
लांजा (प्रतिनिधी) : तालुक्यातील निवसर शिवार भाटले येथे आंबा-काजू बागेमध्ये एका रानगव्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्याच्या मृत्यूचे कारण
स्पष्ट झालेले नाही.
निवसर शिवार भाटले या ठिकाणी भरत रामचंद्र झाडवे यांच्या बागेमध्ये ही घटना घडली होती.
या घटनेची माहिती गावचे पोलीस पाटील दत्ताराम शांताराम मेस्त्री यांनी दूरध्वनीद्वारे लांजाचे वनपाल धुळू कोळेकर यांना दिली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. मृत रानगवा अंदाजे १० ते १२ वर्षे वयाचा असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर लांजा येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अनुसे यांच्यामार्फत मृत रानगव्याचे शवविच्छेदन करण्यात आले.
या कारवाईदरम्यान विवेक कांबळे, सागर तारी, शरद शिंदे, प्रशांत शिंदे, गावचे पोलीस पाटील दत्ताराम मेस्त्री यांच्यासह वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी रत्नागिरी विक्रम गुरव, परिमंडळ वन अधिकारी धुळू कोळेकर, वनरक्षक नमिता कांबळे व श्रावणी पवार तसेच जलद बचाव पथक लांजाचे सदस्य अमित लांजेकर यांनी सहभाग घेतला.
सदर कारवाई विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्रीमती गिरीजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
दरम्यान, रानगव्याच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.













