सभापती सिद्धेश रावराणे यांचे आवाहन; सडूरे येथे कामांचा शुभारंभ
वैभववाडी l प्रतिनिधी : शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा शेतकऱ्यांनी पुरेपूर लाभ घ्यावा. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाच्या कामांना सर्वांनी प्राधान्य देणे आवश्यक आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने जलतारा व शोषखड्ड्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. या कामांचा शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होणार असून, संबंधित लाभार्थ्यांना शासनाकडून अनुदानही मिळणार आहे, असे प्रतिपादन पंचायत समिती वैभववाडीचे सभापती सिद्धेश रावराणे यांनी केले.
सडूरे-शिराळे ग्रामपंचायत अंतर्गत सडूरे येथे जलतारा व शोषखड्डे कामांचा शुभारंभ सभापती सिद्धेश रावराणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
जिल्हा परिषदेकडून पंचायत समितीला वनराई व कच्च्या बंधाऱ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे हे बंधारे श्रमदानातून पूर्ण करता आले. या कामांचे संपूर्ण श्रेय जनतेचे आहे, असेही रावराणे यांनी नमूद केले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य रिद्धी सुतार, गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ, सहाय्यक गटविकास अधिकारी स्नेहा माने, सडूरे सरपंच दीपक चव्हाण, उपसरपंच नवलराज काळे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. काटे, रितेश सुतार, विस्तार अधिकारी प्रकाश अडुळकर, अमित चव्हाण, तालुका कृषी अधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी महिला शेतकरी प्रमाणपत्रांचे वाटप सभापती सिद्धेश रावराणे यांच्या हस्ते करण्यात आले.
जलतारा योजनेअंतर्गत किमान ४० गुंठे जमीनधारक शेतकऱ्यांना ५ हजार ५०० रुपये, तर शोषखड्डा कामासाठी २ हजार ५०० रुपये अनुदान VB-G RAM G योजनेतून देण्यात येणार आहे. वैभववाडी तालुक्यासाठी जलताराची १ हजार ७०० कामे, तर शोषखड्ड्यांची ३ हजार ५०० कामे करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
या योजनांचा लाभ तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन सभापती सिद्धेश दिलीप रावराणे यांनी केले.













