साळशी शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा
शिरगाव (प्रतिनिधी) : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यामार्फत दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘आयडॉल टीचर पुरस्कार’देवगड तालुक्यातील केंद्र साळशी नं. १ शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका सौ. स्मिता सुनील कोदले यांना जाहीर झाला आहे. त्यांच्या या निवडीमुळे साळशी शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, देवगड तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
स्मिता कोदले या अध्यापन कार्यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम, गुणवत्तापूर्ण अध्यापन, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे, विविध शैक्षणिक स्पर्धांमध्ये सहभागासाठी प्रोत्साहन देणे, तसेच शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शन अशा विविध क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे.
विद्यार्थीकेंद्रित अध्यापन पद्धती, शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी घेतलेले प्रयत्न आणि शाळेच्या प्रगतीसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती व प्रशाळेच्या वतीने स्मिता कोदले यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रभाकर साळसकर, राजेंद्र साटम, पोलीस पाटील कामिनी नाईक, केंद्रप्रमुख सुनील कोदले, केंद्रमुख्याध्यापक प्रकाश झाडे, केंद्रातील शिक्षकवृंद, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
त्यांच्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, ग्रामस्थ, पालक व शिक्षणप्रेमींनी अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.













