आयडॉल टीचर पुरस्काराने किशोर कदम सन्मानित; शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक कार्याचा गौरव

मसुरे | झुंजार पेडणेकर : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘आयडॉल टीचर’ पुरस्कार जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, ओसरगाव नंबर १ चे प्राथमिक शिक्षक श्री. किशोर देऊ कदम यांना जाहीर झाल्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे अभिनंदन व गौरव करण्यात आला.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जिवबा अपराज, मुख्याध्यापिका शितल दळवी, नयन आलव, राजश्री तांबे, प्रमिता तांबे,अंगणवाडी सेविका येरलकर मॅडम, सुषमा आलव, सर्व विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
किशोर देऊ कदम सर यांच्या शैक्षणिक, साहित्यिक आणि सामाजिक कार्याची ही महत्त्वपूर्ण दखल आहे. यापूर्वी त्यांना जिल्हा परिषद सिंधुदुर्गचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे. वक्तृत्व शैलीतील ‘युगनायकांची जीवनगाथा’ आणि बालकवितासंग्रह ‘बालविश्व’ ही त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
जिल्हास्तरीय शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत समाजशास्त्र विषयावरील व्हिडिओला प्रथम क्रमांक मिळाला आहे. एकता कल्चर अकादमीतर्फे त्यांना उत्कृष्ट काव्य पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तसेच कणकवली महाविद्यालयात आयोजित इतिहास संशोधन कार्यशाळेत त्यांनी सादर केलेला ‘मुक्ता साळवे’ हा विषयावरील निबंध प्रसिद्ध झाला आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या पुढाकाराने बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले. तसेच राजे प्रतिष्ठान सिंधु यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी धनुर्विद्या, मल्लखांब आदी प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते.
त्यांच्या या यशाबद्दल ओसरगावच्या सरपंच सुप्रिया कदम, माजी विद्यार्थी समितीचे अध्यक्ष ॲड. विलास परब आणि केंद्रप्रमुख पंढरीनाथ तेंडोलकर यांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे.
किशोर देऊ कदम यांच्या या पुरस्कारामुळे ओसरगाव शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून त्यांच्या निवडीबद्दल शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.