‘इको-सेन्सिटिव्ह झोन’ मागणीला बळ
पर्यावरण प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण
बांदा : प्रतिनिधी
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गालगत अगदी हाकेच्या अंतरावर तालुक्यातील इन्सुली क्षेत्रफळवाडी नजीकच्या दाट जंगलात एका भव्य पट्टेरी वाघाच्या दर्शनाने मोठी खळबळ उडाली आहे. रस्त्याच्या अगदी बाजूला असलेल्या एका खडकावर हा वाघ अत्यंत शांतपणे बसलेला होता. यामुळे या भागातील पट्टेरी वाघाच्या अस्तित्वावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. या महत्त्वपूर्ण घटनेमुळे गेली अनेक वर्षे या संवेदनशील नैसर्गिक पट्ट्याला ‘इको-सेन्सिटिव्ह झोन’ (पर्यावरण संवेदनशील क्षेत्र) म्हणून घोषित करण्याची मागणी करणाऱ्या पर्यावरणप्रेमींच्या संघर्षाला मोठे बळ मिळाले आहे.
वाघाच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब
सावंतवाडी आणि माजगाव नजीकच्या या पट्ट्यात मोठे राखीव जंगल आहे. या जंगलात पट्टेरी वाघाचा वावर असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये नेहमीच होत होती. मात्र ठोस पुरावा उपलब्ध नव्हता. मंगळवारी सकाळी रस्त्याने प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांना हा पट्टेरी वाघ अचानक खडकावर दिसला. प्रवाशांनी तत्काळ हा दुर्मिळ क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आणि त्याची माहिती वेगाने पसरली.
हा व्हिडिओ आणि माहिती तातडीने वनविभाग आणि पर्यावरणप्रेमींपर्यंत पोहोचताच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या पट्ट्यात वाघाचे वास्तव्य सिद्ध झाल्याने येथील जैविक समृद्धी आणि वन्यजीव संरक्षण यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची निकड आता स्पष्ट झाली आहे.
’इको-सेन्सिटिव्ह झोन’च्या मागणीला धार
हा पट्टा सह्याद्रीच्या नैसर्गिक साखळीचा एक महत्त्वाचा भाग आहे. वाघाचे दर्शन झाल्यामुळे या परिसराचे महत्त्व अधिक वाढले आहे. या भागाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी त्याला तातडीने ‘इको-सेन्सिटिव्ह झोन’ म्हणून घोषित करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी पुन्हा जोरकसपणे लावून धरली आहे. या वाघाच्या दर्शनाने वनविभाग आणि स्थानिक नागरिकांना या वन्यजीवांच्या संरक्षणाची जबाबदारी अधिक गांभीर्याने घेण्याची गरज अधोरेखित केली आहे.











