सातार्डा दारू तस्करीत दोन संशयित आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी

चौघांवर गुन्हा दाखल ; दोघांचा शोध सुरू

सावंतवाडी :
तालुक्यातील सातार्डा चेकपोस्टवर पोलिसांच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी सुमारे ४३ लाख रुपयांची गोवा बनावटीची दारू आणि वीस लाखांचा टेम्पो असा एकूण ६३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत मोठी कारवाई केली होती. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कारवाईत पोलिसांनी भास्करप्रदिप रामाराव त्रिमलशेटी आणि व्यंकटनागरान गोपाळकृष्ण बालम या दोघांना घटनास्थळावरून ताब्यात घेतले होते.

​त्यानंतर चौकशीत आरोस येथील निरंजन आनंद नाईक आणि आंध्र प्रदेशमधील बॉबी पडाला या अन्य दोघांची नावे निष्पन्न झाली असून, या चौघांच्या संगनमताने ही बेकायदेशीर दारू वाहतूक झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांना बुधवारी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस अन्य दोन संशयितांचा कसून शोध घेत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक हर्षद हिंगे करत आहेत