बँक ऑफ इंडिया व धान फाऊंडेशनतर्फे आर्थिक समावेशन संतृप्ती अभियानांतर्गत कार्यक्रम
सावंतवाडी । प्रतिनिधी :
ग्रामीण भागातील जनतेमध्ये आर्थिक जाणिवा प्रगल्भ व्हाव्यात आणि शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत विनाअडथळा पोहोचावा, या उदात्त हेतूने सावंतवाडी तालुक्यातील गुळदुवे गावात आर्थिक साक्षरता कार्यक्रम व आर्थिक समावेशन संतृप्ती अभियानाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. भारतीय रिझर्व्ह बँक, जिल्हा अग्रणी बँक (बँक ऑफ इंडिया), धान फाऊंडेशन आर्थिक साक्षरता केंद्र, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
गुळदुवे ग्रामपंचायत क्षेत्रांतर्गत येणाऱ्या या गावात बँक ऑफ इंडिया, आरोंदा शाखेच्या वतीने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी बँक ऑफ इंडिया आरोंदा शाखेचे व्यवस्थापक श्री. प्रधान , धान फाउंडेशनच्या असोसिएट श्रुती रेडकर यांच्यासह गुळदुवे ग्रामपंचायतीचे सन्माननीय सदस्य, कर्मचारी, सीआरपी (CRP), आशाताई आणि कृषी सहाय्यक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्या कार्यक्रमासाठी गुळदुवे ग्रामपंचायतचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजना यांसारख्या लोककल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. यादरम्यान आधारकार्ड बँक खात्याशी जोडणे, किसान क्रेडिट कार्ड व प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया, विद्यमान जनधन व इतर बचत खात्यांचे पुनः केवायसी, प्रलंबित खात्यांसाठी ई-केवायसी प्रक्रिया तसेच निष्क्रिय जनधन खाती पुन्हा सक्रिय करणे यांसारख्या महत्त्वाच्या बँकिंग सेवांवर विशेष भर देण्यात आला.
बँकिंग सेवांचा प्रभावी व सुयोग्य वापर, दैनंदिन जीवनातील बचतीचे महत्त्व, आपत्कालीन प्रसंगी विमा संरक्षणाचे अपरिहार्य अंग आणि सामाजिक सुरक्षा योजनांबाबत जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. अभियानाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित ग्रामस्थांना आपले आधारकार्ड, बँक पासबुक, मोबाईल फोन आणि आवश्यकतेनुसार वारसदारांची माहिती यांसारखी कागदपत्रे सोबत आणण्याचे आवाहन करण्यात आले होते. या सर्वसमावेशक उपक्रमामुळे गुळदुवे गावातील ग्रामस्थ अधिक सक्षमपणे आधुनिक बँकिंग सेवांशी जोडले जातील आणि विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून त्यांचा आर्थिक विकास साधण्यास मोलाची मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.












