मालवणमधील आठ बंगल्यांमध्ये घरफोडी; दोन संशयित ताब्यात!

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई; सोन्याचे दागिने व रोकड चोरीप्रकरणी तपासाला वेग

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

मालवण-कट्टा येथील निसर्गनगरी संकुलातील आठ बंगल्यांचे दरवाजे उचकटून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरणाऱ्या घरफोडीप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. सुशील यशवंत आळावे (वय २२, रा. देवली गवाणवाडी, मालवण) आणि संतोष मधुसूदन पांगे (वय ४८, रा. धुरीवाडा, मालवण) अशी त्यांची नावे आहेत. दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मालवण-कट्टा येथील निसर्गनगरी संकुलात २५ ऑक्टोबर रोजी रात्री ११ ते २६ ऑक्टोबर रोजी पहाटे ३ वाजण्याच्या दरम्यान ही घरफोडी झाली होती. चोरट्यांनी संकुलातील एकूण आठ बंगल्यांच्या दरवाजांचे कडी-कोयंडे उचकटून आत प्रवेश केला आणि सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात २६ ऑक्टोबर रोजी भारतीय न्याय संहिता कलम ३०५ व ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने समांतर तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली विविध पथके नियुक्त करण्यात आली होती. घटनास्थळावरून मिळालेली माहिती, मानवी कौशल्य आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी सुशील आळावे व संतोष पांगे यांना ५ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान दोघांनीही सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. वैद्यकीय तपासणीनंतर दोघांनाही पुढील तपासासाठी मालवण पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर व अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या आदेशानुसार, पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, हनुमंत भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, पोलीस हवालदार विल्सन डिसोझा, आशिष जामदार, जॅकसन घोन्साल्वीस, किरण देसाई, राजेंद्र गोसावी, पोलीस अंमलदार अमर कांडर आणि सायबर विभागाच्या धनश्री परब यांचा समावेश होता.