दोडामार्ग (प्रतिनिधी):दोडामार्ग तालुक्यातील सासोली येथील सामायिक जमिनीत सुरू असलेल्या कारभाराविरोधात स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पिढ्यान्पिढ्या जपलेल्या आपल्या जमिनीवर जाण्यासाठीच शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागत असल्याची व्यथा ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील यांच्यासमोर मांडली. ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर जयंत पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत, स्वतःच्या जमिनीत जाणाऱ्या शेतकऱ्यांना कोणीही अडवू शकत नाही, असे स्पष्ट करत अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे.
सासोली येथील ग्रामदेवतेच्या सातेरी मंदिरात नुकतीच ही महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी आ. जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे स्थानिक नेते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
शेतकऱ्यांनाच स्वतःच्या जमिनीत जाण्यास मज्जाव?
सासोली परिसरातील २३ सातबारा उताऱ्यांवर सुमारे १२ एकर सामाईक स्वरूपाची जमीन आहे. मात्र, कंपनीकडून पोलीस बंदोबस्ताच्या आधारे जमिनीची मोजणी आणि अन्य कामे केली जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला. विशेषतः पाण्याची उपलब्धता आणि रस्त्यांची सोय असलेल्या भागातील जमिनींवर अडथळे निर्माण केले जात असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. जमिनीची मोजणी सुरू असताना मूळ जमीनधारक शेतकऱ्यांनाच पोलिसांकडून नोटिसा देऊन मोजणीच्या ठिकाणापासून दूर ठेवले जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. तसेच, अनेकांच्या काजू बागांचे जेसीबीच्या साहाय्याने नुकसान करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
उच्च न्यायालयात लढा उभारण्याचे आवाहन
ग्रामस्थांची व्यथा ऐकून घेतल्यानंतर आ. पाटील यांनी त्यांना कायदेशीर मार्गाने एकत्रित लढा उभारण्याचे आवाहन केले. “सर्वांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे आणि उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी. वकिलांशी चर्चा करून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, विधानसभेच्या आगामी अधिवेशनात हा प्रश्न जोरदारपणे उपस्थित करून महसूलमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या बैठकीत सासोली ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी यापूर्वी दाखल केलेली तक्रार मागे घेतल्यावरून ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
या संपूर्ण प्रकरणावर ग्रामस्थांनी एक समिती स्थापन करून सर्व कागदपत्रे आणि पुरावे एकत्रित करण्याचे सुचवत, शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन आ. जयंत पाटील यांनी दिले.













