राजापूर (प्रतिनिधी): राजापूर शहरातील समर्थ नगर (भटाळी) येथील रहिवाशी व सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक श्रीनिवास कृष्णाजी अमृते (८३) यांचे नुकतेच ह्दविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
मुळचे तालुक्यातील शेढे गावातील रहिवाशी असलेले अमृते हे नोकरी निमित्ताने राजापूर शहरात समर्थ नगर (भटाळी) येथे स्थायिक झाले होते. त्यांना ह्दविकाराचा तीव्र झटका आल्याने तातडीने त्यांना रत्नागिरीतील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालावली. प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांनी तालुक्यातील विविध शाळांमध्ये काम केले होते. एक आदर्श व शिस्तप्रिय शिक्षक अशी त्यांची ओळख होती. एक शांत, संयमी व मितभाषी व्यक्तीमत्व म्हणून ते परिचित होते. अमृते गुरूजी या नावानेही त्यांना अनेकजण ओळखत होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.













