चिपळूण (प्रतिनिधी) : पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर चिपळूण शहरातून वाहणार्या वाशिष्ठी नदीला खेर्डी जॅकवेल येथे पाटबंधारे विभागाकडून बंधारा घालण्याचे काम सुरू आहे. मात्र, प्रत्यक्षात रेल्वे पूल ते जॅकवेल दरम्यान मोठ्या प्रमाणात गाळ असताना तो गाळ काढण्याऐवजी आधीच बंधारा घालण्यात येत आहे. त्यामुळे या भागातील गाळ काढून कच्चा बंधारा घालावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार यांनी केली आहे.
यावर्षी पाऊस अत्यंत कमी झाला. पावसाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात चिपळूण परिसरात पाऊसच झालेला नाही. मात्र, कोयना धरण यावर्षी शंभर टक्के भरले. कोयना धरणातील जलसाठ्यापैकी 67 टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी वापरण्यात येते. चार टप्प्यातून ही वीजनिर्मिती करून उर्वरित अवजल कालव्यातून वाशिष्ठी नदीला सोडण्यात येते. त्यामुळे वाशिष्ठी नदी बारमाही वाहत असते. या पाण्यावर लोटे, गाणे-खडपोली, खेर्डी एमआयडीसी, लोटेतील पंधरा गावे, तसेच वाशिष्ठी नदीकिनाऱ्यावर असलेली पिंपळी, खेर्डी, चिपळूण नगरपरिषद, मिरजोळी आदी गावांच्या नळपाणी पुरवठा योजना याच पाण्यावर अवलंबून आहेत. अंजनवेल येथील आरजीपीपीएलसाठी या शिवाय कोकण रेल्वेला देखील वाशिष्ठी नदीतूनच पाणी उचलले जाते. त्यातून पाटबंधारे विभागाला मोठ्या प्रमाणात महसूल देखील मिळत असतो. मात्र, यावर्षी पाऊस कमी झाल्याने वाशिष्ठी नदी ऐन हिवाळ्यातच कोरडी पडू लागली आहे. त्यामुळे वीजनिर्मिती करून येणारे पाणी जॅकवेलसाठी अडविण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.
लोटे एमआयडीसीला देखील पाण्याची मोठ्या प्रमाणात गरज असून वाशिष्ठीला बंधारा बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्या दृष्टीने जलसंपदा विभाग व यांत्रिकी विभागाच्यावतीने खेर्डी जॅकवेलजवळ कच्चा बधांरा बांधण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र, बाहेरून माती-दगड आणून हा बंधारा बांधण्यात येत आहे. त्या ऐवजी कोकण रेल्वे पूल ते खेर्डी जॅकवेल दरम्यान असणारा मोठ्या प्रमाणावरील गाळ काढला तर अधिक जलसंचय होऊ शकतो आणि पाण्याचा प्रश्नदेखील काहीअंशी सुटू शकतो, असे प्रकाश पवार यांचे म्हणणे आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने या मागणीचा रास्त विचार करावा व कोकण रेल्वे पूल व बहादूरशेख दरम्यानचा गाळ काढावा. हा गाळ काढल्यास पात्राची खोली वाढेल आणि त्यामध्ये पाणीसाठा होईल. या बाबत तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी पवार यांनी केली आहे.













