सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड येथे जमीन वादातून दोन गटांत राडा
१३ जणांवर सावंतवाडी पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गंभीर गुन्हे दाखल
सावंतवाडी : तालुक्यातील मळेवाड नाईकवाडी येथे जमिनीच्या जुन्या वादातून झालेल्या वादानंतर दोन गटांत प्रचंड राडा झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात १३ जणांविरोधात विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मळेवाड सर्वे क्रमांक ११/६ मधील एक आणि ११/७ मधील एक या जमीन जागेच्या मालकी हक्कावरून आणि व्यवहारावरून दोन्ही बाजूंत वाद सुरू आहेत. फिर्यादी रमेश सीताराम कारूडेकर यांनी संबंधित जमीन खरेदी केली असून त्याबाबतचा वाद तहसीलदार सावंतवाडी यांच्या न्यायालयात प्रलंबित होता, तर दुसरीकडे प्रतिवादींनी हे खरेदीखत रद्दबातल ठरवण्यासाठी मळेवाड तलाठी कार्यालयाकडे अर्ज दाखल केला होता. याच पूर्वमनस्पातावरून आणि वादाच्या पार्श्वभूमीवर हा तणाव विकोपाला गेला.
घटना घडली त्या रात्रीच्या सुमारास फिर्यादी रमेश कारूडेकर हे आपल्या कुटुंबियांसोबत घरी उपस्थित असताना संशयित आरोपींनी एकत्र जमून सुनियोजितरीत्या हल्ला केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात नंदकिशोर नारायण नाईक, दाजी रमाकांत नाईक, लक्ष्मण नाईक, अमोल आनंद नाईक, आत्माराम नाईक, तुषार नाईक, गुरुप्रसाद नाईक, पद्माकर नाईक, अमीत हरिश्चंद्र नाईक, सविता नाईक, प्राजक्ता रमाकांत नाईक, इंदू नाईक, हर्षा नाईक यांच्यासह इतर काही जण मिळून जमाव फिर्यादीच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गोळा झाला. संशयित आरोपींनी आक्रमक पवित्रा घेत परिसरात अर्वाच्य शिवीगाळ सुरू केली आणि घराच्या गेटचे नुकसान केले. त्यानंतर कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता थेट फिर्यादीच्या खासगी अंगणात घुसखोरी करून उपस्थितांच्या अंगावर धावून जात बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
या हिंसक प्रकारादरम्यान घटनास्थळी एकच तारांबळ उडाली. फिर्यादीची चुलत सून सूची कारूडेकर ही घडत असलेल्या संपूर्ण प्रकाराची मोबाईलद्वारे चित्रफीत तयार करत असताना त्यांनी तिच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून खाली फेकून दिला आणि त्याचे नुकसान केले. तसेच तिलाही धक्काबुक्की करत मारहाण केली. याशिवाय फिर्यादीची सून साक्षी राजेश कारूडेकर हिच्या अंगावर धाऊन जात जीवे मारण्याची धमकी दिली.
केवळ कुटुंबातील सदस्यांनाच नव्हे, तर परिसरातील नागरिकांना आणि दुकानदारांनाही दहशत खाली आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. फिर्यादीच्या घराशेजारील दुकानगाळेधारकांना जर दुकाने उघडली, तर त्यांची तोडफोड करण्यात येईल अशी उघड धमकी देण्यात आली, अशी तक्रार सावंतवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
या प्रकरणी रमेश सीताराम कारूडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सावंतवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामध्ये बेकायदेशीर जमाव जमवणे, दुखापत करणे, धमकी देणे, मालमत्तेचे नुकसान करणे आणि आपसात तेढ निर्माण करणाऱ्या कलमांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली आणि घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अरवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी पोलीस करत असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या घटनेमुळे मळेवाड परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून दोन्ही गटांमधील वाढलेल्या संघर्षामुळे पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.













