झाराप पत्रादेवी बायपास ओलांडून माजगावकडे प्रयाण
चक्क दिवाळी दिवशी दिले मळगाव वासियाना दर्शन
ओमकारला पाहण्यासाठी आबाल – वृद्धांची तोबा गर्दी
सावंतवाडी । सचिन रेडकर : गेले कित्येक दिवस सावंतवाडी तालुक्यात ठाण मांडून असलेल्या ओमकार हत्तीने आज दिवाळीच्या पहाटे पहाटे मळगाव वासियांना दर्शन दिले. मळगाव सोनुर्ली सीमेवरील दोन गावांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील दोन पूर्वज मंदिराकडे तो प्रथम निदर्शनास आला. त्यानंतर हॉटेल शालूच्या दिशेने गेलेला ओमकार माघारी फिरला व चॉकलेट फॅक्टरी कडून झाराप पत्रादेवी महामार्ग ओलांडून माजगाव जंगलाच्या दिशेने तो रवाना झाला. यावेळी महामार्गावर त्याला पाहण्यासाठी आबाल-वृद्धांनी तोबा गर्दी केली होती. त्याच्या एका दर्शनाची झलक प्रत्येकाने आपापल्या मोबाईल मध्ये कैद केली. तसेच याची देही याची डोळा त्याचे दर्शन घेऊन काहीजण तृप्त झाले. ओमकार ओमकार अशा हाका देत लहान मुले त्याचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा प्रयत्न करत होते. तर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी ग्रामस्थांना ओमकार पासून दूर ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करताना दिसत होते.













