शैक्षणिक क्षेत्रातील सहकाऱ्यांचे श्रद्धांजली सभेत भावोद्गार
विकासभाईंची शैक्षणिक स्वप्ने पूर्ण करण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचा संकल्प
सावंतवाडी । प्रतिनिधी :
शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष स्व. विकासभाई सावंत यांच्या निधनाने सावंतवाडी आणि परिसरातील शैक्षणिक, सामाजिक तसेच राजकीय क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या बहुआयामी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा ठसा पावलोपावली जाणवत राहील. त्यांच्या निधनाने आम्ही आमच्या कुटुंबप्रमुखालाच मुकलो आहोत, अशा शब्दांत शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालक, पदाधिकारी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी आदरांजली वाहिली.
विकासभाईंनी ३५ वर्षे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष म्हणून केलेल्या अतुलनीय कार्यामुळे आर.पी.डी. सह सर्व शैक्षणिक संकुल एका उंच स्थानावर पोहोचले आहे. त्यांची शैक्षणिक स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.
विविध शैक्षणिक संस्थांच्या वतीने आयोजित श्रद्धांजली सभेमध्ये शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार सी.एल. नाईक, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, व्ही.बी. नाईक, संचालक अमोल सावंत, प्रा. सतीश बागवे, संदीप राणे, सीताराम गावडे, अँड. शामराव सावंत, वासुदेव शिरोडकर, चंद्रकांत सावंत, गिरीधर परांजपे, सोनाली सावंत, डॉ. अशोक सुर्वे, लवू गावडे, राजेंद्र म्हापसेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
विकासभाईंच्या कार्याला उजाळा
ज्येष्ठ शिक्षक व्ही.बी. नाईक यांनी विकासभाईंच्या उपस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या चैतन्याची आठवण करून दिली. ते म्हणाले की, “विकासभाईंनी शैक्षणिक प्रगतीत संस्थांना उंचीवर नेऊन ठेवले. गेली ३५ वर्षांपासून त्यांनी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्षपद भूषवून कुटुंबप्रमुखाचा सन्मान राखला. भाईंचा समृद्ध वारसा त्यांनी जोपासला आणि हे शैक्षणिक संकुल निर्माण करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यांचा आत्मविश्वास दांडगा होता आणि समोरच्या व्यक्तीचे मन जिंकणारा त्यांचा स्वभाव होता. त्यांनी कधीही मनभेद होऊ दिले नाहीत.”
सकल मराठा समाज अध्यक्ष सीताराम गावडे यांनी विकासभाईंच्या पश्चात त्यांनी केलेल्या अभूतपूर्व कामांची प्रशंसा केली. त्यांनी पदांसाठी कधीही तत्त्वे सोडली नाहीत, असे गावडे यांनी नमूद केले. रावजी यादव यांनी विकासभाईंनी जिल्हा परिषद सभापती म्हणून केलेल्या अभ्यासपूर्ण कामाचे कौतुक केले.
माजगावचे प्रतिनिधी म्हणून बोलताना चंद्रकांत सावंत यांनी माजी आरोग्यमंत्री कै. भाईसाहेब सावंत आणि विकासभाईंच्या आठवणींना उजाळा दिला. वासुदेव शिरोडकर यांनी विकासभाईंनी विविध शैक्षणिक संस्था निर्माण केल्याने त्यांना ‘शिक्षणमहर्षी’ म्हटले पाहिजे, असे मत व्यक्त केले.
बाबा चांदेकर यांनी विकास सावंत हे पालकत्व स्वीकारणारे आणि संस्था अध्यक्ष म्हणून कायमच प्रोत्साहन देणारे सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्व होते, असे सांगितले.
यावेळी जे.बी. नाईक महाविद्यालय प्राचार्य सौ. ठाकूर, माजी प्राचार्य महादेव धुरी, चंद्रकांत सावंत, बाळासाहेब नंदीहल्ली, श्री. देवरकर, प्रा. सतीश बागवे, रमाकांत जाधव, प्राचार्य संप्रवी कशाळीकर आदींनीही विकासभाईंना श्रद्धांजली वाहिली.
या श्रद्धांजली सभेस शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीचे सर्व संचालक, पदाधिकारी व सदस्य, तसेच संस्था संचलित आर.पी.डी. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी, दोडामार्ग येथील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, चौकुळ येथील विद्यालय, तसेच जे.बी. नाईक महाविद्यालय, शांतिनिकेतन विद्यामंदिर, नामदार भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान तसेच आजी-माजी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.












