ठाकर लोककलेचा सांस्कृतिक वारसा अनुभवण्यासाठी रसिकांची उपस्थिती
पिंगुळी (ता. कुडाळ) : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय ‘पिंगुळी कला महोत्सवा’चे उदघाटन शुक्रवार, दि. ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ठाकर आदिवासी कला आंगण संग्रहालय व आर्ट गॅलरी, पिंगुळी येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
या महोत्सवाच्या माध्यमातून ठाकर समाजाच्या समृद्ध लोककला, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडत असून, लोककलेचे जतन, संवर्धन आणि नव्या पिढीपर्यंत तिचा वारसा पोहोचविण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात येत आहे.
या उद्घाटन सोहळ्याला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, पद्मश्री परशुराम विश्राम गंगावणे, सेन्सॉर बोर्ड सदस्य व नाट्यकर्मी विजय चव्हाण, सांस्कृतिक कार्य विभागाचे अधिकारी संदीप बळवडे, सरपंच अजय आकेरकर, सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजाचे अध्यक्ष शशांक आटक, उपसरपंच मंगेश मसके, टंटामुक्ती समिती अध्यक्ष भगवान रणसिंग, समन्वयक मंगेश खरात, चेतन गंगावणे, एकनाथ गंगावणे आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचे उदघाटन करताना जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी पद्मश्री परशुराम गंगावणे आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या लोककला जतन व संवर्धनाच्या कार्याचे विशेष कौतुक केले. त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्रातील पारंपरिक लोककलांना राज्यासह देशपातळीवर मानाचे स्थान मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
नाट्यकर्मी विजय चव्हाण यांनी पिंगुळीची ठाकर लोककला ही सिंधुदुर्गच्या सांस्कृतिक वैभवातील मानाचा तुरा असल्याचे सांगितले. अशा महोत्सवांमुळे पारंपरिक लोककलांना नवे व्यासपीठ मिळत असून, पुढील पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख होण्यास मदत होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी दोडामार्ग-कोनाळकट्टा येथील राधानृत्य, महिलांची फुगडी, कळसूत्री बाहुल्या, पांगुळ बैल, पिंगुळी-मालवणी गोंधळ आणि चित्रकथी अशा विविध पारंपरिक लोककलांचे सादरीकरण करण्यात आले. या कलाविष्कारांनी उपस्थित रसिकांची मने जिंकली.
शनिवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता कळसूत्री बाहुल्या आणि इतर पारंपरिक लोककलांचे सादरीकरण होणार असून, रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
पिंगुळीच्या मातीत जपलेल्या लोककलेचा समृद्ध वारसा जगासमोर आणण्याबरोबरच कलाकारांना प्रोत्साहन देणारा हा महोत्सव सिंधुदुर्गच्या सांस्कृतिक इतिहासातील एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरत आहे.













