युवा उद्योजक अक्षय केसरकर यांच्याकडून केरवडे कार्याद नारूर नं. १ शाळेला कलर प्रिंटर प्रदान

​कुडाळ । प्रतिनिधी : कुडाळ तालुक्यातील महादेवाचे केरवडे गावातील केरवडे कार्याद नारूर नं. १ शाळेला युवा उद्योजक सन्मा. श्री. अक्षय केसरकर यांनी सुमारे वीस हजार रुपये किमतीचा कलर प्रिंटर प्रदान करून आपले सामाजिक दायित्व सिद्ध केले. मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच हा प्रिंटर शाळेला सुपूर्द करण्यात आला.
​यानिमित्ताने शाळेत आयोजित केलेल्या छोटेखानी प्रिंटर प्रदान कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर परब यांनी यावेळी बोलताना केसरकर कुटुंबाच्या गावातील सहकार्य आणि समाजकार्याबद्दल गौरवोद्गार काढले. या उल्लेखनीय समाजकार्याबद्दल आणि दातृत्वाबद्दल गावाच्या सरपंच प्राची परब यांनी ग्रामपंचायत करवडेमार्फत आभारपत्र देऊन श्री. अक्षय केसरकर यांचा सन्मान केला.

​व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांनीही केसरकर यांच्या कार्याचे कौतुक केले. माजी सरपंच पंढरीनाथ परब आणि हळदीची नेरूर केंद्राचे केंद्रप्रमुख चंद्रकांत धुरी यांनी या समाजकार्याला शुभेच्छा दिल्या. या प्रिंटरसाठी ज्यांनी आव्हान केले ते याच शाळेचे माजी विद्यार्थी आणि शिक्षक नेते गणेश नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांमार्फत यापुढेही प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
​शाळेचे मुख्याध्यापक गुंजाळ सर यांनी शाळेच्या वतीने अक्षय केसरकर यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी आणि समाजकार्यासाठी शुभेच्छा दिल्या. शाळा केरवडे नं. १ मार्फत अक्षय केसरकर यांना शाल, श्रीफळ आणि आभारपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी अक्षय केसरकर यांच्या पत्नी आणि त्यांचे वडील शंकर केसरकर यांचीही उपस्थिती होती.

​श्री. अक्षय केसरकर यांनी आपले पुढेही शाळेसाठी सहकार्य राहील अशी ग्वाही यावेळी दिली. या कार्यक्रमाला पालक, शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी, उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.