हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवण यांच्या वतीने भरडनाका येथे भव्य आयोजन
लहान गटात अनुश्री मेस्त्री प्रथम ; मोठ्या गटात गुरु तुळसकर आणि आरव यांनी पटकाविला प्रथम क्रमांक
मालवण | प्रतिनिधी : भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील विविध प्रसंग, त्यांच्या बाललीला आणि चरित्रातील आदर्शांची ओळख नव्या पिढीला व्हावी, तसेच भारतीय संस्कृती, पारंपरिक वेशभूषा आणि बालकलागुणांना प्रोत्साहन मिळावे, या उदात्त उद्देशाने हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती, मालवण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धा २०२६’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नरक चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला मालवण शहरातील भरड नाका येथे भव्यदिव्य स्वरूपात संपन्न झालेल्या या स्पर्धेत अवघ्या एक वर्षाच्या बालकलावंत यांसह विविध वयोगटांतील स्पर्धकांनी साकारलेल्या वेशभूषा व श्रीकृष्णाची मनोहारी रूपे उपस्थितांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.
तब्बल चार तास रंगलेल्या या स्पर्धेत बालकृष्णाच्या विविध रूपांसह श्रीकृष्ण चरित्रातील प्रसंगांचे प्रभावी सादरीकरण पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. स्पर्धेतील लहान गटात अनुश्री सुभाष मेस्त्री हिने प्रथम क्रमांक पटकाविला, तर मोठ्या गटात गुरु तुळसकर आणि आरव यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. स्पर्धकांचा उत्साह, पालकांचा सक्रिय सहभाग आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद यामुळे संपूर्ण स्पर्धा सोहळा संस्मरणीय ठरला.
हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीचे संयोजक अमित खोत, सहसंयोजक भाऊ सामंत आणि समितीच्या सर्व सदस्यांच्या नियोजनातून, नागरिकांच्या सहकार्यातून तसेच स्पर्धकांच्या उत्स्फूर्त सहभागातून या दिमाखदार स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. भारतीय संस्कृतीचा समृद्ध वारसा जपतानाच नव्या पिढीमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राविषयी आदर, श्रद्धा निर्माण करण्याचा संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात आला.
मालवण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. ज्योती तोरसकर यांनी स्पर्धा आयोजनामागील संकल्पना स्पष्ट करताना भारतीय संस्कृती, परंपरा आणि श्रीकृष्ण चरित्राच्या महत्त्वाविषयी विचार मांडले. उद्घाटन सोहळ्याला उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पुनम चव्हाण, महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, स्पर्धा संयोजक अमित खोत, सहसंयोजक भाऊ सामंत, शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख बबन शिंदे, शिवसेना शहरप्रमुख राजू बिडये, ज्येष्ठ नगरसेविका शर्वरी पाटकर, नीना मुंबरकर, महानंदा खानोलकर, अश्विनी कांदळकर, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक महेश कांदळगांवकर, नगरसेवक रवीकिरण तोरसकर, सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत, उमेश मांजरेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल देसाई आणि शिक्षक प्रभुदास आजगावकर यांनी केले. स्पर्धकांच्या वेशभूषेतील वैशिष्ट्ये, सादरीकरणातील कल्पकता आणि श्रीकृष्ण चरित्रातील प्रसंगांचे प्रभावी चित्रण, मोठी एलईडी स्क्रीन यामुळे स्पर्धेत विशेष रंगत निर्माण झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय सातार्डेकर यांनी केले.
*स्पर्धा आयोजनाचे सर्व स्तरातून कौतुक!*
स्पर्धेच्या आयोजनाचे विशेष कौतुक करताना नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचे संवर्धन करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. बालवयातच मुलांना आपल्या संस्कृतीची, धार्मिक परंपरांची आणि आदर्श चरित्रांची ओळख करून देणे महत्त्वाचे आहे. अशा स्पर्धांमुळे मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्याबरोबरच त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो. हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीने सलग दुसऱ्या वर्षी आयोजित केलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. ज्योती तोरसकर यांनी भगवान श्रीकृष्णाच्या विविध लीलांचे महत्त्व विशद केले. नरक चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी नरकासुराच्या प्रतिमांच्या माध्यमातून होत असलेल्या उदात्तीकरणाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रातील आदर्श, त्यांच्या कार्याचे महत्त्व आणि सांस्कृतिक मूल्यांची ओळख नव्या पिढीला करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. श्रीकृष्ण चरित्रावर आधारित वेशभूषा स्पर्धा हा त्या दृष्टीने अत्यंत स्तुत्य उपक्रम असून, या अभिनव संकल्पनेबद्दल त्यांनी आयोजकांचे विशेष अभिनंदन केले.
*सन्मानचिन्ह, रोख बक्षिसे गौरव पत्र व भेटवस्तू*
स्पर्धेतील लहान गटातील बक्षिसे महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर यांनी पुरस्कृत केली, तर मोठ्या गटातील बक्षिसे स्वच्छता व आरोग्य सभापती पुनम चव्हाण यांनी पुरस्कृत केली. सामाजिक कार्यकर्ते भूषण मेस्त्री यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देऊन प्रोत्साहन दिले. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक सन्मानचिन्ह व सर्व सहभागी स्पर्धकांना गौरव पत्र देण्यात आली. विजेत्यांसह सहभागी कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
*वेशभूषा स्पर्धेचा निकाल*
लहान गट : प्रथम क्रमांक – अनुश्री सुभाष मेस्त्री, द्वितीय क्रमांक – नेत्रा नितीन माणगावकर, तृतीय क्रमांक – ओजस रोहित पाटकर. उत्तेजनार्थ – प्रभाकर रुपेश धुरी, युगांश स्वप्नील केळूसकर, समर्थ विवेक कोरगावकर, रियांश कामतेकर आणि अन्वित अश्विन भोगले यांना गौरविण्यात आले. तसेच समर्थ गणेश सातार्डेकर आणि सारा प्रवीण पवार यांना विशेष वेशभूषा सादरीकरणाबद्दल सन्मानित करण्यात आले.
*मोठा गट :* प्रथम क्रमांक – गुरु तुळसकर आणि आरव, द्वितीय क्रमांक – हार्दिक परुळेकर आणि गजानन मांजरेकर, तृतीय क्रमांक – रेवा सुहास जोशी. उत्तेजनार्थ – सई सुखानंद कांबळी आणि सचिन वराडकर यांना सन्मानित करण्यात आले. स्पर्धेदरम्यान नाट्यदिग्दर्शक गणेश मेस्त्री यांच्या संकल्पनेतून रेवा जोशी यांनी दोन नृत्ये सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या नृत्याविष्कारामुळे कार्यक्रमात विशेष रंगत निर्माण झाली.
*स्पर्धेच्या यशस्वितेसाठी अनेकांचे मोलाचे योगदान*
या भव्य स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पुनम चव्हाण, महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, राजू बिडये, बबन शिंदे, बंटी केनवडेकर, अमृता फाटक, अनिकेत फाटक, हरेश फडते, गणेश मेस्त्री, प्रशांत हिंदळेकर, गणेश चव्हाण, बबन परुळेकर, महेश कांदळगांवकर, शर्वरी पाटकर, निना मुंबरकर, ऋषी पेणकर, गुरुनाथ राणे, शिल्पा खोत, अंजली केनवडेकर, विकी तोरसकर, विराज आचरेकर, निखिल वस्त, शेखर मोर्वेकर, भूषण मेस्त्री, सुहास गवाणकर, सौगंध बादेकर, निलेश गवंडी, डॉ. श्रीपाद गिरसागर, नारायण धुरी, साईराज चव्हाण, अविनाश सामंत, प्रसाद हळदणकर, स्वप्नील घाडी, तेजस चव्हाण, शुभम मेस्त्री, रुपेश हळदणकर यांच्यासह अनेकांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या वतीने आवश्यक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कार्यक्रमस्थळी नागरिकांची मोठी उपस्थिती लक्षात घेऊन वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली. वाहतूक व्यवस्थेचे सुयोग्य नियोजन करण्यात आल्याने कार्यक्रम सुरळीत पार पडला.
भगवान श्रीकृष्णाच्या विविध रूपांचे दर्शन घडविणारी, बालकलाकारांच्या कल्पकतेला व्यासपीठ उपलब्ध करून देणारी आणि भारतीय संस्कृतीचा जागर करणारी ही स्पर्धा विशेष आकर्षण ठरली. हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या या उपक्रमाचे मान्यवर, पालक आणि नागरिकांकडून विशेष कौतुक करण्यात आले.













