पालखी सोहळा मार्गावर मालवण नगरपरिषद स्वच्छता विभागाच्या वतीने विशेष स्वच्छता मोहीम!

स्वच्छता व आरोग्य सभापती पुनम चव्हाण यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी; स्वच्छतेच्या कामांचा घेतला आढावा

मालवण | प्रतिनिधी : मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण यांचा पारंपरिक आणि ऐतिहासिक पालखी प्रदक्षिणा सोहळा मंगळवार, दि. १० नोव्हेंबर रोजी मोठ्या भक्तिभावाने साजरा होणार आहे. या सोहळ्याच्या स्वागतासाठी मालवण नगरी सज्ज होत असून, पालखी प्रदक्षिणा मार्ग स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी मालवण नगरपरिषदेच्या स्वच्छता व आरोग्य विभागाच्या वतीने विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. स्वच्छता व आरोग्य सभापती पुनम चव्हाण यांनी स्वतः पालखी मार्गावरील विविध ठिकाणी भेटी देऊन सुरू असलेल्या स्वच्छतेच्या कामांची पाहणी केली. तसेच संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या.

 

मालवणच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेत श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण यांच्या पालखी प्रदक्षिणा सोहळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण मालवण शहरात भक्तिमय वातावरण निर्माण होत आहे. पालखी मार्गावर कोणत्याही प्रकारची अस्वच्छता राहू नये, तसेच भाविकांना स्वच्छ आणि प्रसन्न वातावरणात पालखी सोहळ्यात सहभागी होता यावे, यासाठी नगरपरिषद प्रशासनाकडून विशेष दक्षता घेतली जात आहे.

 

या मोहिमेंतर्गत पालखी मार्गावरील रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेली झाडेझुडपे तोडण्यात आली असून, ग्रास कटरच्या साहाय्याने वाढलेले गवतही साफ करण्यात आले आहे. त्याचबरोबर रस्ते झाडून स्वच्छ करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पालखी मार्गावरील प्रत्येक परिसर स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीने स्वच्छता विभागाचे कर्मचारी कार्यरत आहेत.

 

स्वच्छता व आरोग्य सभापती पुनम चव्हाण यांनी विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन स्वच्छतेच्या कामांचा आढावा घेतला. ऐतिहासिक पालखी प्रदक्षिणा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेच्या कामात कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी नगरपरिषद प्रशासन प्रयत्नशील आहे.

 

दरम्यान, मालवणच्या ग्रामदैवतांच्या पालखी प्रदक्षिणा सोहळ्याचे पावित्र्य आणि शहराचे स्वच्छ, सुंदर स्वरूप जपणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे पालखी मार्गावर तसेच परिसरात नागरिकांनी उघड्यावर कचरा टाकू नये. सार्वजनिक स्वच्छता राखून नगरपरिषद प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन स्वच्छता व आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.