पाककृतीत वर्षा धोंड, वनौषधी ओळख स्पर्धेत सावरेश्वर बचत गट प्रथम
वेंगुर्ले | प्रतिनिधी : आवेरे ग्रामस्थ आणि आवेरे-तेंडोली जिल्हा परिषद शाळा यांनी आयोजित केलेल्या रानभाजी पाककला आणि वनौषधी ओळख स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रानभाजी पाककृती स्पर्धेत सौ. वर्षा यशवंत धोंड यांनी सादर केलेल्या भरलेली कंटोळी या पाककृतीने तर, वनौषधी ओळख स्पर्धेत सावरेश्वर महिला बचत गट आवेरेने प्रथम क्रमांक प्राप्त केला. आवेरे-तेंडोली जिल्हा परिषद शाळेत घेण्यात आलेल्या या स्पर्धेचे उ्दघाटन तेंडुली गावच्या सरपंचा अनघा तेंडुलकर व उपसरपंच संदेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य आकाश मुणनकर, दिलीप राऊळ, सौ. सुधा राऊळ, माजी सरपंच मंगेश प्रभू, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अश्विनीकुमार मांजरेकर, शाळेचे मुख्याध्यापक हृदयनाथ गावडे सहाय्यक शिक्षक भानू गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.
रानभाजी पाककृती स्पर्धा: या स्पर्धेत एकूण 29 महिला स्पर्धकांनी सहभाग दर्शविला होता. परिसरातील रानात आढळून येणाऱ्या विविध रानभाज्यांपासून विविध प्रकारच्या पाककृती औषधी गुणधर्मांसह सादर करून महिलांनी ही स्पर्धा यादगार केली. स्पर्धेत सौ. वर्षा यशवंत धोंड यांनी सादर केलेल्या भरलेली कंटोळी या पाककृतीने प्रथम क्रमांक, सौ. जाई सुनील नाईक यांच्या एक पानाची वडी व लाजरीची भाजी या पाककृतीस द्वितीय, पाटेश्वर महिला बचत गटाने केलेल्या दुदरल्याची वडी व चूरण पानाची भाजी या पाककृतीस तृतीय तर वैशाली विनोद दुतोंडकर यांच्या कंटोळी कटलेट या पाककृतीस उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले.
वनौषधी ओळख स्पर्धा: या स्पर्धेतही परिसरातील महिलांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेतला. गावातील महिलांनी परिसरातील जंगलभागातून असंख्य वनौषधी संकलित करून प्रत्येक वनौषधीची ओळख व त्याचे मानवी आरोग्यास होणारे फायदे कौशल्याने विषद केले. 29 प्रकारच्या वनौषधीची ओळख करून देणाऱ्या सावरेश्वर बचत गटाने स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. 40 वनौषधी सादर करणाऱ्या कमळेश्वर महिला बचत गटाने द्वितीय, सौ. प्रमोदिनी प्रभाकर आसोलकर यांनी तृतीय तर वर्षा यशवंत धोंड यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला.
या दोन्ही स्पर्धांचे परीक्षण पत्रकार तथा शाश्वत सेवा बहुउद्देशीय संस्थेचे सचिव महेंद्र मातोंडकर यांनी केले. फास्टफूडचा अतिरेक माणसाचे आयुर्मान घटण्यास कारणीभूत ठरत आहे. भेसळीचा भस्मासुर एवढा मातला आहे की माणसाला नक्की काय खावे असा यक्षप्रश्न पडला आहे. देशाचे भविष्य असणारी युवा पिढी अनेक व्याधीनी त्रस्त आहे. अनेकांना कमी वयातच हृदयविकाराच्या आजाराने आपले आयुष्य गमवावे लागले आहे. अशा या विदारकतेवर रानभाज्या आणि वनौषधी हा एक आशेचा किरण आहे. निसर्गात विविध सीजनमध्ये उपलब्ध होणाऱ्या रानभाज्या औषधी गुणधर्माने युक्त असल्याने त्या मानवी जीवनास वरदान ठरणाऱ्या आहेत. म्हणूनच रानभाज्यांचे सेवन प्रत्येकाने करायलाच हवे. त्यासाठी जनमाणसात जागृती होणे गरजेचे आहे. हीच गरज ओळखून आवेरे शाळेने आयोजित केलेला उपक्रम आदर्शवत आहे, असे प्रतिपादन यावेळी बोलताना महेंद्र मातोंडकर यांनी केले. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण खानोली नाईकवाडी येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील नाईक व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. स्पर्धेसाठी अवी दुतोंडकर, रतन धुरी, राजू बाळोजी, सुनिल सावंत,आनंद सातार्डेकर,विनोद दुतोंडकर, सत्यवान दुतोंडकर, प्रसाद सातार्डेकर, राजू वाडेकर, समीर केळुसकर, दिपक वराडकर, अक्षय सातार्डेकर
यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक हृदयनाथ गावडे आणि उपशिक्षक श्री.भानू गोसावी यांनी केले.












