“एक पेड माँ के नाम” उपक्रमांतर्गत श्री वेताळ विद्यामंदिर, तुळस येथे १२५ झाडांची लागवड..

वेंगुर्ले l प्रतिनिधी :पर्यावरण रक्षणाची जाणीव आणि मातृप्रेमाची भावना यांचा समन्वय साधणाऱ्या “एक पेड माँ के नाम” या अनोख्या उपक्रमांतर्गत जि.प. शाळा श्री वेताळ विद्यामंदिर, तुळस येथे १२५ सुपारी आणि सोनचाफा यांची लागवड करण्यात आली. यासाठी सामाजिक कार्यकर्ते अरविंद नाईक यांनी झाडे उपलब्ध करुन सहकार्य केले.

या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या मातेसमोर एक झाड लावून ते झाड तिच्या नावे समर्पित केले. या माध्यमातून झाडांप्रती जबाबदारीची भावना आणि संवेदनशीलता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याचा उद्देश या उपक्रमामागे होता. या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अदिती तांबोसकर, उपाध्यक्षा विभा आंगणे, मुख्याध्यापक प्रशांत हरमलकर, शिक्षिका लीना नाईक, शाळा व्यवस्थापन समिती शिक्षण तज्ञ डॉ. सचिन परुळकर, गायत्री आरमारकर, अर्पिता नाईक, मुग्धा लिंगोजी,अक्षरा साळगावकर, माधुरी राऊळ, जान्हवी सावंत, योगिता गावडे, शिवानी सावंत, वैदेही राऊळ, दर्शना तुळसकर आदी पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

मुख्याध्यापक श्री. प्रशांत हरमलकर यांनी वृक्षांचे पर्यावरणातील महत्त्व विषद करताना सांगितले की, “झाडे ही निसर्गाची फुफ्फुसे आहेत; त्यांचे संगोपन करणं म्हणजे स्वतःच्या भविष्याची काळजी घेणं होय.”

शाळेच्या शिक्षिका लीना नाईक यांनी विद्यार्थ्यांना झाडांशी नाते जोडण्याचे महत्त्व समजावून सांगितले. पालकांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेत झाडांच्या संगोपनाची जबाबदारी पत्करली.