सामाजिक उपक्रम आणि जलसंधारणातून भाजपा तालुकाध्यक्ष विनोद चाळके यांचा वाढदिवस साजरा

आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिर, माजी सैनिकांचा सन्मान आणि बंधाऱ्याची उभारणी

खेड (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीचे खेड तालुकाध्यक्ष विनोद चाळके यांचा वाढदिवस यंदा सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी आणि विधायक उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिर, आजी-माजी सैनिकांसोबत दिवाळी फराळाचा स्नेहमेळावा आणि जलसंधारणाच्या माध्यमातून वाढदिवसाला सामाजिक कार्याची जोड देण्यात आली.
परिसरातील तीव्र पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन विनोद चाळके यांच्या नेतृत्वाखाली धामणंद पायरवाडी येथे जॅकवेलच्या बाजूला नवीन बंधाऱ्याची उभारणी करण्यात आली. या उपक्रमामुळे पाणी साठवणूक आणि जलसंधारणाला हातभार लागणार असून, परिसरातील ग्रामस्थांना भविष्यात पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी मदत होणार आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.
बाई रतनाबाई घरडा हॉस्पिटल, खेड येथे आयोजित रक्तदान शिबिराला भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या शिबिरातून रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
याचबरोबर आजी-माजी सैनिकांसोबत दिवाळी फराळाचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला. देशसेवेसाठी योगदान दिलेल्या सैनिकांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद साजरा करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान काही माजी सैनिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. आमदार प्रमोद जठार यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
आमदार प्रमोद जठार यांनी भाजपा खेड तालुकाध्यक्ष विनोद चाळके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक आणि संघटनात्मक कार्याचे कौतुक केले. भविष्यातही त्यांच्या हातून समाजोपयोगी आणि विकासात्मक कार्य घडत राहावे, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमांना रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, जिल्हा महामंत्री वसंत ताम्हणकर, भाजपा ज्येष्ठ मार्गदर्शक राजूभाई रेड्डीज, गुहागर पंचायत समितीचे उपसभापती निलेश सुर्वे, तालुका सरचिटणीस संदेश म्हापदी, तालुका उपाध्यक्ष संकेत हुमणे, महिला मोर्चा अध्यक्ष प्रीतम उतेकर, माजी सरपंच जयराम उतेकर, तालुका उपाध्यक्ष मेजर विजय जाधव यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.