खेड (प्रतिनिधी):
खेड तालुक्यातील बोरघर-राहाटवाडी येथे एका बंद दुमजली घराचे सेफ्टी डोअर आणि आतील दरवाजाचे कुलूप उचकटून अज्ञात चोरट्याने घरातील लोखंडी कपाटातील रोख रक्कम चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील गोरेगाव (पश्चिम) येथे राहणारे आणि सध्या खेड येथे वास्तव्यास असलेले वकील सुधीर सीताराम पवार (वय ५०) यांचे बोरघर राहाटवाडी येथे दुमजली घर आहे. दिनांक ११ सप्टेंबर रोजी रात्री ८.०० ते १४ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० या कालावधीत फिर्यादी हे घरात नसताना ही चोरी झाली. घराच्या सेफ्टी डोअरचे तसेच आतील दरवाजाचे कुलूप अज्ञात व्यक्तीने कोणत्या तरी हत्याराने उचकटले आणि घरात अनधिकृत प्रवेश केला.
चोरट्याने घरातील साहित्याची उचकापाचूक करून अस्ताव्यस्त केले व लोखंडी कपाट आणि त्यातील लॉकर उघडून त्यामध्ये ठेवलेली ५ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पवार यांनी खेड पोलिसांत तक्रार नोंदवली.
त्यांच्या फिर्यादीवरून खेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५(अ) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ३११/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घरफोडीचा पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.











